Sharad Pawar : लखीमपूर हिंसेवरून शरद पवारांनी भाजपवर साधला निशाणा | पुढारी

Sharad Pawar : लखीमपूर हिंसेवरून शरद पवारांनी भाजपवर साधला निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखीमपूर-खेरी हिंसाचार प्रकरणावर देशातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावर शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “तुमच्या हाती कशासाठी सत्ता दिली, याचं विस्मरण भाजपला झालेलं आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार (Sharad Pawar) पुढे म्हणाले की, “देश शेतीप्रधान आहे. ६० टक्के लोक शेती करतात. सोलापूर औद्यागिक शहर आहे. पण, ती स्थिती आता राहिलेली नाही. देशातील अनेक जिल्हे, राज्य शेती उत्पादनात अग्रेसर आहे. पण, ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. त्यांची शेतकरी आणि शेती व्यवसायाविषयी भूमिका काय आहे? त्यांना शेतकऱ्यांविषयी यत्किंचितही आस्था नाही”, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर टीका केली.

ईडीवरूनही शरद पवारांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “सरकारी पाहुण्यांची चिंता नाही. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी रस्त्यावर आले. आमच्या प्रश्नांकडे भाजपचं सरकार दुर्लक्ष करतं. याबद्दलची नापसंती व्यक्त करण्यासाठी ते आले. तिथे शेतकरी आल्यानंतर भाजपचे नेते रस्त्याने जात असताना त्या शेतकऱ्यांच्या अंगावर त्यांनी गाड्या घातल्या.”

“या हिंसाचारात ८ लोक मृत्यूमुखी पडले. सर्वोच्च न्यायालयाने नोटीस काढून जे लोक मृत्यूमुखी पडले त्या सगळ्यांची माहिती मागवली आहे. लोकांनी हातात सत्ता लोकांचं भलं करण्यासाठी दिली आहे, याचं विस्मरण भाजप सरकारला झालं आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांची हत्या करण्याचं पाप केलं. याचा संताप पूर्ण देशात आहे”, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Back to top button