लखीमपूर : शेतकऱ्यांना रस्त्यावर चिरडणाऱ्या केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा पुत्र अटकेत | पुढारी

लखीमपूर : शेतकऱ्यांना रस्त्यावर चिरडणाऱ्या केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा पुत्र अटकेत

लखीमपूर ; वृत्तसंस्था : लखीमपूर खिरी येथे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना चिरडून ठार मारण्याच्या आरोपाखाली केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यास 12 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर अखेर विशेष तपास पथकाने शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास अटक केली.

लखीमपूर हिंसाचारात आशिष याने आंदोलक शेतकर्‍यांच्या अंगावर भरधाव जीप घातल्याचा आरोप आहे. या हिंसाचारात चार शेतकर्‍यांचा जीव गेला तर इतर चौघे मृत्युमुखी पडले. या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटले. मात्र केंद्रीय मंत्री मिश्रा हे त्यांच्या मुलाचा बचाव करीत होते.

हिंसाचाराच्या सातव्या दिवशी मुख्य आरोपी आशिष मिश्रा शनिवारी क्राईम ब्रँचसमोर हजर झाला खरा; मात्र सुमारे बारा तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या चौकशीदरम्यान त्याने पोलिसांच्या प्रश्‍नाला योग्य उत्तरे दिली नाहीत; किंबहुना, त्याने असहकार्यच केले. त्यामुळे पोलिसांनी त्यालागजाआड केले. त्याला उद्या (रविवारी) कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिश्रा याला अकरा वाजता बोलावण्यात आले होते.

मात्र तो तत्पूर्वीच 10 वाजून 36 मिनिटांनी हजर झाला. एसआयटीने जवळपास बारा तासांहून अधिक काळ त्याची चौकशी केली. त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येत होती. पोलिसांनी त्यादृष्टीने तयारी केली होती.
चौकशी करणार्‍या पथकाने त्याच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली; मात्र त्याने योग्य ते सहकार्य केले नाही. अखेर रात्री त्याला अटक करण्यात आली.

हिंसाचाराच्या घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्रा हाच आहे, शिवाय या हिंसाचारप्रकरणी त्याचे वडील आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा या दोघांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी संयुक्‍त किसान मोर्चाने रेटून धरली आहे.

या पार्श्‍वभूमीवर शनिवारी एसआयटीसमोर दाखल होताना आशिषने आपले तोंड झाकून घेतले होते. आशिषचा जबाब दंडाधिकार्‍यांसमोर नोंदविण्यात आला. आशिषसोबतच त्याचे वकील तसेच वडील व मंत्री अजय मिश्रा यांचा प्रतिनिधीही हजर होता. आशिष मिश्रा हजर होणार असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती.

दहा जणांचे प्रतिज्ञापत्रही ठरले कुचकामी

आशिष मिश्रा याची सहा जणांच्या पथकाकडून चौकशी झाली. वरिष्ठ पोलिस अधिकारी उपेंद्र अग्रवाल यांचाही त्यात समावेश होता. आशिष मिश्रा याने आपली बाजू मांडण्यासाठी अनेक व्हिडीओ सादर केले. 10 जणांचे प्रतिज्ञापत्रही आशिषने सादर केले. मात्र ही प्रतिज्ञापत्रेही कुचकामी ठरली.

Back to top button