Lok Sabha Election 2024 
Latest

Loksabha Election : सोलापूरच्या बैठकीत उमेदवार निवाडीवरुन राडा

Shambhuraj Pachindre

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात उमेदवार ठरविण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत चांगलाच राडा झाला. मराठा समाजाने उमेदवार दिल्यास त्याचा फायदा मराठा आरक्षणविरोधी भूमिका घेणार्‍या भाजपला किंबहुना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच होणार आहे. त्यामुळे मूळ हेतूलाच हरताळ फासल्यासारखे होईल. तेव्हा हा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आणून द्या, असे म्हणत राम साठे, महेश पवार व अन्य काही मंडळींनी सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांच्या हातातील माईक हिसकावून त्यांना बोलण्यास मज्जाव केला. (Loksabha Election)

यावेळी एकमेकात झालेल्या हमरीतुमरीवरून 'अरे वरून कारे' वर विषय आल्याने बराच गोंधळ झाला. त्यानंतर प्रकरण मुद्यावरून गुद्यावर येईल, हे ओळखून राजन जाधव व चंद्रकांत पवार यांनी मध्यस्थी करीत प्रकरण शांत केले. त्यानंतर बैठक गुंडाळण्याची नामुष्की संयोजकावर ओढवली. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य शासनाने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करीत जरांगे पाटील यांनी सुरूवातीला लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज भरून निवडणूक आयोग व सरकारची कोंडी करण्याचा निर्णय घेतला होता. (Loksabha Election)

त्यानंतर हा निर्णय मागे घेत एकास एक उमेदवार देऊन मराठा समाजाची ताकद दाखविण्याचा विडा उचलला. त्याअनुषंगाने राज्यभरात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात बैठका घेऊन इच्छुकांच्या नावाचा अहवाल पाठविण्याच्या सूचना जरांगे पाटील यांनी केल्या होत्या. त्यानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि सोलापूर शहरातील मराठा समाज व बहुजन समाज बांधवांची आज (दि.29) छत्रपती शिवाजी प्रशालेत उमेदवारीबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती.

विशेष म्हणजे समाजबांधवांच्या उपस्थितीअभावी बैठक दीड तास उशिरा सुरू करण्याची नामुष्की सुरूवातीलाच ओढवली. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देणार्‍या मराठा समाजाच्या बैठकीला केवळ शंभरावरच समाजबांधवांची उपस्थिती होती. प्रा.गणेश देशमुख यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश सांगितला. त्यानंतर विविध जातीधर्मातील 15 इच्छुकांनी आपला परिचय करून दिला. यात माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, कैलास सातपुते (टेंभूर्णी), सचिन मस्के, नागेश माने, बिभिषण देवकुळे, दीपक गवळी, केतन कसबे, आतिष बनसोडे, अमोल सोनवणे आदींचा समावेश होता.

शेवटी माउली पवार बोलण्यास उभारले असता त्यांना बोलण्यास राम साठे यांच्यासह इतर मंडळींनी हरकत घेतली. आपला मूळ हेतू आरक्षण आणि आरक्षणाला विरोध करणार्‍यांना अडचणीत आणण्याचा आहे. परंतु आपण आज जी उमेदवार देण्याची भूमिका घेत आहात. ती पूर्ण चुकीची आहे. आपल्याला आरक्षण नाकारणार्‍या सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या उमेदवारांना धडा शिकवायचा आहे. त्यामुळे आपण उमेदवार दिल्यास आपला हेतू सफल होणार नाही.

उलट याचा भाजपलाच फायदा होईल. हा मुद्दा तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या निदर्शनास आणून द्या, असा आग्रह राम साठे व इतरांनी धरला. मात्र बैठकीचे संयोजक तथा सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार ऐकण्यास तयार नव्हते. ते आपल्या मतावर ठाम होते. यामुळे संतप्त झालेले राम साठे यांच्यासह इतर मंडळींची माउली पवार यांच्याबरोबर शाब्दिक चकमक होऊन हमरीतुमरी झाली. अशात पवार यांच्या हातातील माईक हिसकावून घेण्यात आला.

बैठकीला वेगळे वळण लागू नये म्हणून राजन जाधव व चंद्रकांत पवार यांनी समझोत्याची भुमिका घेत दोन्ही बाजूच्या मंडळींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करून यशस्वी मध्यस्थी केली. मात्र बैठक गुंडाळावी लागली. या बैठकीसाठी लहु गायकवाड, प्रा.संजय जाधव, गणेश नीळ, दत्ता भोसले, राजेश गवळी, संजय व्हनमारे यांच्यासह निवडक समाजबांधव उपस्थित होते. आजच्या बैठकीतील विषयावरून मराठा समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

नेतेमंडळी कुठे आहेत

यापूर्वी पार पडलेल्या अनेक बैठका, मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित असणारी विविध राजकीय पक्षातील नेतेमंडळी आजच्या बैठकीला का आली नाहीत, याचा जाब राम साठे यांनी सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांना विचारला. यावरून राम साठे व माउली पवार यांच्यात खडाजंगी झाला आणि विषय ताणला गेल्याने शेवटी बैठक गुंडाळावी लागली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT