Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election : मुंबईकरांना मतदानादिवशी मेट्रोकडून खास सवलत

करण शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या सर्व प्रवाशांना (दि. २०) रोजी प्रवासी तिकिटावर १०% सवलत देण्याचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे. ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या माध्यमातून, आतापर्यंत सुमारे ९० कोटी नागरिकांनी प्रवास केला असल्याने मुंबई मेट्रोचा उपयुक्तता अधोरेखित झाली आहे.

मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान (दि.२०) रोजी होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मतदार म्हणून मतदान करण्याकरीता लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी शासनामार्फत सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येत आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा, यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये मतदान करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना प्रोत्साहित करून त्यांच्या मतदानाच्या कर्तुत्वाबाबत जाणीव करून देण्यासाठी, महामुंबई मेट्रो मतदार जागरूकता आणि सहभाग (SVEEP) या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. मुंबई मेट्रोने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा, या दृष्टीने महामुंबई मेट्रो प्रयत्नशील आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल आणि त्यांना मतदान केंद्रापर्यंत आरामदायक प्रवास करता यावा असा उद्देश आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT