1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. परंतु त्यांच्या कार्यकाळात बोफोर्स भ्रष्टाचाराचे प्रकरण चव्हाट्यावर आले. त्यांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी व्ही. पी. सिंह यांनी राजीव गांधी यांच्याविरोधात आघाडी उभारली. सिंह यांच्या पुढाकाराने भाजप, कम्युनिस्ट वगळता अन्य प्रमुख विरोधी पक्ष एकत्र झाले व त्यांनी जनता दलाची स्थापना केली. नियमानुसार लोकसभेची मुदत संपल्याने 22 आणि 26 नोव्हेंबर 1989 रोजी लोकसभेसाठी मतदान घेण्यात आले. त्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक 197 जागा मिळाल्या. जनता दल 143, भाजप 85, माकप 33 व उर्वरित अन्य पक्ष, अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. भाजपने सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचे ठरविल्याने व्ही. पी. सिंह पंतप्रधान झाले. (Lok Sabha Election 2024)
या निवडणुकीपूर्वी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये महाराष्ट्रात युती झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भाजप नेते प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे आदी नेत्यांच्या चर्चेतून युतीवर शिक्कामोर्तब झाले आणि 89 च्या निवडणुकात युतीचे उमेदवार उभे करण्याचे ठरले. या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून अधिकृत मान्यता मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचे उमेदवार विभिन्न पक्ष चिन्हांवर लढले. परभणीतून निवडून आलेले अशोक देशमुख हे धनुष्यबाणावर लढल्याने या चिन्हावर शिवसेनेने पुढे दावा केला आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका धनुष्यबाणावर लढविल्या.
Lok Sabha Election 2024 | मराठवाड्यात संमिश्र यश
भाजप शिवसेना युती, जनता दलाची निर्मितीमुळे या निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसला समाधानकारक यश मिळू शकले नाही. संभाजीनगरातून मोरेश्वर सावे हे निवडून आले. तांत्रिक कारणामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मशाल चिन्हावर निवडणूक लढविली. बीडची जागा अनपेक्षितपणे जनता दलाचे बबनराव ढाकणे यांनी जिंकली. नांदेडला जनता दलाचे डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी बाजी मारली. हिंगोलीत काँग्रेसचे उतमराव राठोड, लातुरात शिवराज पाटील चाकूरकर, धाराशिवला अरविंद कांबळे तर जालन्यात भाजपचे पुंडलिक हरी दानवे हे विजयी झाले. एकंदर पाहता शिवसेना 2, भाजप 1, जनता दल 2, काँग्रेस 3 असे या विभागाचे पक्षीय बलाबल राहिले.
पोटनिवडणुकीत चव्हाणांची बाजी
दरम्यानच्या काळात मराठवाड्यात नांदडची पोटनिवडणूक झाली होती आणि अवघ्या तीसाव्या वर्षी अशोक चव्हाण यांना मतदारांनी लोकसभेत पाठविले. 1986 मध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना गुणवाढ प्रकरणात हायकोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा शंकरराव चव्हाण हे केेंद्रात मंत्री होते. राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना राज्यात पुन्हा पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नांदेड लोकसभेसाठी 86 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण हे निवडून आले. त्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला. अशोक चव्हाणांना 2 लाख 83 हजार 19, तर अॅड. प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 71 हजार 901 मते मिळाली होती. शंकरराव चव्हाण हे दोन्ही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले. 1989 ला मात्र त्यांचा अनपेक्षितपणे पराभव झाला. परंतु 89 नंतर मात्र मराठवाड्यातील राजकारणात बदलांचे वारे वाहण्यास प्रारंभ झाला. हिंदुत्वाचे वातावरण तयार झाल्याने त्याचा आपसूकच फायदा भाजप, शिवसेनेला मिळाला.
…
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.