Latest

Lok Sabha Election 2024 : वेध लोकसभेचे; जालन्यातून बाबूराव काळे विजयी, परभणीत अण्णासाहेब गव्हाणे पराभूत

सोनाली जाधव
1971 च्या निवडणुकीत एक लाखांवर मते घेत जालन्यातून बाबूराव काळे विजयी झाले. त्यांना एक लाख 82 हजार 17 तर संयुक्त समाजवादी दलाचे साहेबराव सोळंके यांना 55471 आणि अपक्ष महंमद फत्तेह यांना 10630 मते पडली. सिल्लोड, सोयगाव हा भाग जालन्याशी जोडलेला होता. बाबूराव हे सोयगावचे. त्याचाही फायदा लोकसभेत मिळाला. अप्पासाहेब या नावाने त्यांना सर्वजण ओळखत असत.
हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतलेल्या बाबूराव काळे यांनी संभाजीनगरला भूविकास बँकेची स्थापना केली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना 1968 मध्ये त्यांच्या पुढाकारातून केली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेस प्रणित विविध संस्थांची जबाबदारी सांभाळणा-या बाबूराव नेतृत्व दूरदृष्टीचे होते. 1962 ला सिल्‍लोड तर 67 ला भोकरदन मतदारसंघातून ते निवडून आले. 71 ला जालन्यातून लोकसभेची उमेदवारी मिळाली. लोकसभा सदस्यत्व संपल्यानंतर ते विधानपरिषदेचे सदस्य झाले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना ग्रामाविकास खाते त्यांच्याकडे होते आणि पंचायत राज व्यवस्था प्रभावी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. बाबूराव काळे यांनी शिवबा साप्‍ताहिक काही काळ चालविले, तसेच तेव्हाचे स्थानिक दैनिक लोकविजय ला भरपूर मदत केली. साहित्य, लेखन हा त्यांचा विशेष गुण होता. साहित्यविषयक अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावत असत. साहित्य कला मंडळ ही संस्था त्यांनी स्थापन केली. तसेच उर्दू साहित्य अकादमीलाही सहकार्य केले.

मराठवाड्याच्या मुख्यमंत्र्यासाठी आग्रही

मराठवाडा विकास आंदोलनात मराठवाड्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी एक मागणी पुढे आली होती. त्यात बाबूराव हे अग्रणी होते. त्यासाठी सुभेदारी विश्रामगृहात त्यांनी व काँग्रेस नेते बाळासाहेब पवार यांनी पत्रपरिषद घेत तेव्हांचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना हटविण्याची मागणी केली, असे जुने पत्रकार सांगतात. या मागणीची दखल घेत काँग्रेस पक्षाने नाईक यांच्याऐवजी मराठवाड्याचे नेते शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. चव्हाण, वसंतदादा पाटील, बॅ. अंतुले, बाबासाहेब भोसले मंत्रिमंडळात बाबूरावांनी विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. 17 ऑक्टोबर, 1985 (वय 60) त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईत एका हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. पण तेथेच तीन दिवसांनी त्यांचे निधन झाले.

शेकापची परभणीत हार

यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांत भविष्य अजमावून पाहणारे अण्णासाहेब गव्हाणे यांना परभणीत काँग्रेसउमेदवार शिवाजीराव देशमुख यांच्याकडून 57 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.  या वेळी परभणीतून संघटनात्मक काँग्रेसकडून नारायण निकुंभ उभे होते. पण त्यांना 12 हजार मते मिळाली. गव्हाणे व अन्य मंडळी पूर्वी काँग्रेस पक्षातच होती. पण धोरणे न पटल्याने तया पक्षाशी फारकत घेत त्यांनी  शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा परभणी व धाराशिव जिल्ह्यात चांगला दबदबा होता. पण अण्णासाहेबांना लोकसभेसाठी पराभूत व्हावे लागले, ते आमदार राहिले हा भाग वेगळा. तसे म्हटले तर 1948 ते 1956 हा काळ शेकापचा सुवर्णकाळ होता.या पक्षाचे 28 आमदार विधानसभेत निवडून गेले होते. 56 ला शेकाप फुटल्यानंतर काही जिल्ह्यांपुरताच शेकाप मर्यादित राहिला. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्र ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी जुन्या सहकार्‍यांना काँग्रेसमध्ये परतण्याचे आवाहन केले होते. त्यास अनुसरून अनेक नेते काँग्रेस पक्षात परत गेले होते.

(संग्रहित : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दादा गोरे आणि  बंकट पाटील यांच्या पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन 14 फेब्रुवारी1976 साली तत्कालिन मंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दत्ता सराफ, आनंद यादव यांच्या हस्ते पार पडला.)

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT