पणजी : पुढारी वृत्तसेवा
Goa Assembly Election 2022 : गोव्यातील भाजपच्या उमेदवारांची यादी आज संध्याकाळी जाहीर केली जाणार आहे. राज्यातील चाळीसही मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता कुणाकुणाची नावे यादीत असणार आहेत, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
उमेदवारांची यादी दिल्लीत होणाऱ्या संसदीय मंडळाच्या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे, संघटन सचिव सतीश धोंड, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पक्षाचे राज्य प्रभारी सी. टी. रवी आणि निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस मंगळवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत.
म्हापसा मतदारसंघात जोशूआ डिसोझा यांची उमेदवारी निश्चित आहे. त्याचबरोबर वाळपई मतदारसंघात डॉ. दिव्या राणे आणि पर्ये मतदारसंघात विश्वजीत राणे, साखळी मतदारसंघात विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ताळगाव मतदारसंघात जेनिफर मोन्सेरात, कुडचडे मतदारसंघात निलेश काब्राल, मडगाव मतदारसंघात बाबू आजगावकर, फातोर्डामधून दामू नाईक, प्रियोळ मतदारसंघात गोविंद गावडे यांची नावे निश्चित आहेत.
दरम्यान, यावेळी पर्ये व वाळपई मदरारसंघांचे उमेदवार अदलाबदल होणार असल्याचे मानले जात आहे.
कुंभारजुवे मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्यासह जिल्हा पंचायत सदस्य तथा श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक यांचेही नाव उमेदवारीसाठी विचारात घेतले आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या बैठकीत उमेदवारी मिळण्यासाठी काय प्रयत्न केले जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांताक्रूझ मतदारसंघातून भंडारी समाजाचे नेते आणि भाजपचे उपाध्यक्ष अनिल होबळे हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी श्रीपाद नाईक शब्द टाकतील का हाही महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या ठिकाणी टोनी फर्नांडिस आणि ताळगावचे माजी सरपंच आग्नेल डिकुन्हा यांचे नाव यादीतून पुढे गेले आहे.
सांगे मतदारसंघातून सुभाष फळदेसाई यांचे नाव घेतले जात असले तरी बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील पेच सोडवण्याचे संसदीय मंडळासमोर आव्हान असेल.
गाभा समितीचे सदस्य माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ ते १३ मतदारसंघातून एकाहून अधिक नावे उमेदवारीसाठी सूचवलेली आहेत. त्या नावांबाबत संसदीय मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे यांनी आज किती मतदारसंघातील उमेदवारांची यादी निश्चित होईल, हे आता सांगता येणार नसल्याचे म्हटले आहे.
काणकोण मतदारसंघात काँग्रेसमधून आलेले इजिदोर फर्नांडिस व भाजपचे मागच्यावेळी पराभूत झालेले रमेश तवडकर असे दोन उमेदवार आहेत. मांद्रे मतदारसंघात दयानंद सोपटेंच्या तुलनेत लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे पारडे थोडे जड दिसते आहे. पेडणेत मगोपमधून आलेल्या प्रवीण आर्लेकर यांची उमेदवारी पक्की झाल्यासारखे आहे. त्यांच्या नावाची औपचारीक घोषणा होणे बाकी आहे.
पणजीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे निवडणूक लढविण्यास उत्सुक असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. मात्र पणजी मतदारसंघातून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळेल याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तर गोवा मतदासंघ
म्हापसा – जोशुआ डिसोझा
हळदोणा – ग्लेन टिकलो
शिवोली – दयानंद मांद्रेकर
पर्वरी – रोहन खंवटे
कळंगुट – गुरुदास शिरोडकर किंवा रिकार्डो डिसोझा
साळगाव – जयेश साळगावकर
वाळपई – डॉ. दिव्या राणे
पर्ये – विश्वजीत राणे
साखळी – डॉ. प्रमोद सावंत
मये – प्रेमेंद्र शेट्ये
डिचोली – राजेश पाटणेकर, शिल्पा नाईक
मांद्रे – दयानंद सोपटे, लक्ष्मीकांत पार्सेकर
पेडणे – प्रवीण आर्लेकर
पणजी – बाबूश मोन्सेरात, उत्पल पर्रीकर
ताळगाव – जेनिफर मोन्सेरात
सांत आंद्रे – फ्रान्सिस सिल्वेरा, धाकु मडकईकर सांताक्रुझ – टोनी फर्नांडिस, अनिल होबळे, आग्नेल डिकुन्हा
कुंभारजुवे – पांडुरंग मडकईकर, सिद्धेश नाईक
सांगे – सुभाष फळदेसाई
केपे – बाबू कवळेकर
कुडचडे – निलेश काब्राल
मडगाव – बाबू आजगावकर
फातोर्डा – दामू नाईक
वेळ्ळी – फिलिप नेरी रॉड्रिग्ज (भाजप पाठिंबा)
कुडतरी – भाजप पुरस्कृत
बाणावली – भाजप पुरस्कृत
कुंकळ्ळी – क्लाफास डायस
नुवे – विल्फ्रेड डीसा (भाजप पाठिंबा )
नावेली – परेश गांवकर, किंवा उरफान मुल्ला
काणकोण – इजिदोर फर्नांडिस, रमेश तवडकर
कुठ्ठाळी – अॅन्थनी वाझ किंवा गिरीश पिल्ले
दाबोळी – माविन गुदिन्हो
वास्को – मिलींद नाईक
मुरगाव – दाजी साळकर
फोंडा – रवी नाईक
मडकई – सुदेश भिंगी किंवा विद्या गावडे सतरकर
शिरोडा – सुभाष शिरोडकर
प्रियोळ – गोविंद गावडे
सावर्डे – गणेश गांवकर, दीपक पाऊसकर
हे ही वाचा :