लग्नाच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एका महिलेची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. Reddit वर पोस्ट केलेल्या या अनुभवात अनामिक महिलेने भारतीय महिलांनी लग्न करून काय लाभ होतो, यावर मत विचारले. या पोस्टमधील मुद्द्यांशी अनेक महिला सहमत असल्याचं दिसून आलं, तर काहींनी लग्नाचे फायदेही सांगितले.
महिला म्हणाली, “गृहित धरूया की मी कमावते आहे. जर मी अविवाहित असेन, तर मी सकाळी आईच्या हातचा चहा पिऊन उठते, नाश्ता करते आणि ऑफिसच्या कामासाठी तयार होते. दिवसभर काम करून संध्याकाळी विश्रांती घेते.”
त्यानंतर तिने लिहिलं, “पण जर मी लग्न केले, तर फक्त स्वतःसाठी नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी स्वयंपाक, धुणीभांडी यांची जबाबदारी माझ्यावर येईल. काही लोक म्हणतात, कमावतेस तर बाई ठेवू शकतेस. पण त्याचं पैसे माझ्याच पगारातून जातील. मग नेमकं यात माझा फायदा काय? मी तर कामाची बाईच ठरेल.”
ती पुढे म्हणते, “माझा पगार, माझा आराम कमी होतोय, अनोळखी लोकांमध्ये राहावं लागतंय... मी काही चुकतेय का?”
या महिलेची ही पोस्ट झपाट्याने व्हायरल झाली आणि अनेकांनी आपले अनुभव, मतं शेअर केली. काहींनी लग्नाचे फायदे सांगितले, पण अनेकांनी तिच्या विचारांना १०० टक्के बरोबर म्हटलं.
एक युजर म्हणतो, “लग्नाआधी स्पष्ट करा की तुम्हाला वेगळं राहायचं आहे. जे सहमत नाहीत, ते पुढेच येणार नाहीत. जे सहमत आहेत, त्यांच्याशी पुढे चर्चा करा. दोघं कमावते असाल आणि जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर डबल उत्पन्न आणि भागीदारी – हे विन-विन सिच्युएशन आहे.”
दुसऱ्याने लिहिलं, “लग्न कसं आहे, यावर बरंच काही अवलंबून आहे. जर तुम्ही दिवसभर काम करून सगळं घरकाम एकटी करत असाल, तर खरंच त्यात महिलांसाठी काही फायदा नसतो. पण जबाबदाऱ्या वाटून घेणारा साथी असेल, तर लग्न एक सुंदर सोबतीचा अनुभव ठरू शकतो.”
तिसरा म्हणाला, “सगळ्या फेयरीटेल एंडिंगवर विश्वास ठेवू नका. तुमचं विश्लेषण अगदी योग्य आहे. सासरच्या घरी राहणाऱ्या, काम करणाऱ्या महिलांसाठी हा एक प्रकारचा मानसिक छळ असतो. सिंगल राहण्याची शांतता अमूल्य आहे.”
अजून एकाने म्हटलं, “मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. मी आनंदाने सिंगल आहे. माझ्याकडे कुक आहे, त्यामुळे आईला त्रास नाही. नात्यांचं मेल ड्रामा नाही, माझ्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगते. आणि शेवटी, प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या वेगळी असते.”
एकाने लिहिलं, “सासरच्या लोकांसोबत राहणं ही सर्वात वाईट गोष्ट आहे. लग्न न करणं चांगलं. पण जर प्रेमात लग्न केलं आणि वेगळं राहत असाल, तर असा जोडीदार मिळतो ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य आनंदात जातं.”