हिवाळा आला की वातावरणात गारवा वाढतो आणि हवेतील आर्द्रता कमी होते. या काळात त्वचेतील नैसर्गिक ओलावा (Moisture) कमी होऊ लागतो, परिणामी त्वचा कोरडी, खवलेदार आणि निस्तेज दिसते. ओठ फुटणे, टाचांना भेगा पडणे किंवा हातांवर पांढरे डाग येणे ही त्याची सुरुवातीची लक्षणं असतात. ही समस्या जवळपास प्रत्येकालाच भेडसावते, पण त्यामागील वैज्ञानिक कारणं आणि योग्य घरगुती उपाय जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
हिवाळ्यात हवा कोरडी असते. बाहेरील तसेच घरातील हवेतही आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं, विशेषत: हिटर किंवा ब्लोअर वापरल्याने. आपल्या त्वचेला वातावरणातून आर्द्रता मिळत असते, पण हवेत ओलावा कमी झाला की त्वचेतील ओलावा हवेत मिसळून जातो आणि त्वचा कोरडी होते.
थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याशिवाय राहत नाही, पण हेच त्वचेसाठी सर्वात हानिकारक ठरू शकतं. अतिगरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेलं (Sebum) आणि लिपिड्स काढून टाकतं. ही तेलं त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे वारंवार गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचा कोरडी, खवलेदार आणि निर्जीव होते.
थंड हवामानात तहान कमी लागते, त्यामुळे आपण पाण्याचं सेवन कमी करतो. पण शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं की त्वचेतही ओलावा घटतो आणि कोरडेपणा वाढतो.
थंड वारे त्वचेच्या वरच्या सुरक्षात्मक थराला हानी पोहोचवतात. यामुळे त्वचेतील ओलावा लवकर वाफ होऊन जातो आणि त्वचा खडबडीत वाटू लागते.
कठीण साबण, जास्त प्रमाणात फेसवॉश वापरणं, मॉइस्चरायझर न लावणं किंवा रात्री त्वचेला ओलावा न देणऱ्या सवयी त्वचेचा कोरडेपणा आणखी वाढवतात.
अंघोळीनंतर त्वचा किंचित ओली असताना शरीरावर नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल लावा. या तेलांमधील फॅटी ऍसिड्स त्वचेच्या आतपर्यंत जाऊन ओलावा टिकवून ठेवतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
दही आणि मध एकत्र करून फेसपॅक तयार करा आणि चेहऱ्यावर किंवा कोरड्या भागांवर लावा. दह्यामधील लॅक्टिक ऍसिड त्वचेला सौम्यपणे एक्सफोलिएट करतं, तर मध नैसर्गिक मॉइस्चरायझर म्हणून काम करतं. 10-15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध अॅलोव्हेरा जेल त्वचेवर लावा. हे जेल त्वचेला थंडावा देतं, ओलावा वाढवतं आणि खाज, ताण जाणवणं कमी करतं.
4. पुरेसं पाणी प्या
हिवाळ्यात तहान लागली नाही तरी दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्या. त्याचबरोबर आहारात आंबा, लिंबू, संत्रं, आवळा यांसारखी व्हिटॅमिन C युक्त फळं घ्या. ही त्वचेला आतून ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
रात्री झोपण्यापूर्वी ओठ, टाचांवर किंवा कोरड्या भागांवर पेट्रोलियम जेली, तूप किंवा लोणी लावा. टाचांवर लावल्यावर मोजे घालून झोपा. यामुळे त्वचेत ओलावा लॉक होतो आणि फुटलेल्या भागांना लवकर आराम मिळतो.