काष्टी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (दत्तवाडी) येते शनिवारी (दि.9) पहाटे साडेचार वाजता घरा बाहेर पढवीत झोपलेल्या यमुनाबाई नानासाहेब शिंदे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या महिलेला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नगर येथे उपचारासाठी पाठवले आहे. या महिलेची प्रकृती चिंताजनक असून, गावात आठ दिवसांतील ही दुसरी घटना असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.
तालुक्यातील भीमानदीकाठी असलेल्या अजनुज येथील दत्तवाडीमध्ये यमुनाबाई शिंदे रात्री जेवन झाल्यनंतर घरा बाहेर पत्र्याच्या पढवीमध्ये झोपल्या. पहाटे घरा समोर अंधारात दबाधरून बसलेल्या बिबट्याने वृध्द महिलेच्या अंगावर झडप घालून तोंडाचा चावा घेतला. तेव्हा भोवताली असणार्या पाळीव कुत्र्यांनी मोठा आवाज करून भूंकायला सुरुवात केली. यामुळे बाहेर काही तरी झाले म्हणून घरात झोपले यमुनाबाईचा मुलगा महादेव व हौसेराव शिंदे बाहेर आले. तेव्हा त्यांना आपल्या आईला बिबट्याने धरले असल्याचे दिसले.
याचवेळी त्यांनी आरडाओरडा सुरू केला. यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. यावेळी शेजारील लोक काय? झाले म्हणून मदतीला आले. यावेळी यमुनाबाई यांना पाहिले तर त्यांच्या चेहर्यावर बिबट्याने चावा घेऊन लचके तोडले होते. घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य भानुदास कवडे यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. वेळेचा विलंब न लावता वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी आले. त्यांच्या गाडीमधून त्या यमुनाबाईंना श्रीगोंद्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. परंतु, जखमा मोठ्या असल्याने येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अशीच घटना आठ दिवसांपूर्वी अजनुज मोरेवाडीमध्ये घडली होती. यामध्ये भागचंद शांताराम जाधव हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जख्मी झाला होता. घडलेल्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. यामुळे वनविभागाने गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. पाऊस लांबल्याने शेतातील पिकांना पाणी नाही, आणि आता घोडचे आवर्तन सुटल्यामुळे शेतकरी रात्रीचा शेतावर असल्यामुळे पाणी देण्यासाठी घाबरत असून, झालेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
हेही वाचा