

वॉशिंग्टन ः कधी कधी खेळताना लहान मुलांनाही अनेक दुर्मीळ वस्तू सापडत असतात. एखादे प्राचीन नाणे किंवा अगदी प्राचीन काळातील शार्कचा दातही सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. आता अमेरिकेतील अर्कांससमधील क्रेटर ऑफ डायमंडस् स्टेट पार्कमध्ये एका सात वर्षीय मुलीला चक्क हिरा सापडला आहे.
अर्कांसस स्टेट पार्कनुसार पॅरागोल्ड इथे राहणारी ही मुलगी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी या पार्कमध्ये आली होती. तिचे नाव एस्पेन ब—ाऊन. तिला पार्कमध्ये 2.95 कॅरेटचा हिरा सापडला. हा या पार्कमध्ये यावर्षी एखाद्या व्यक्तीला सापडलेला दुसरा सगळ्यात मोठा हिरा आहे. याआधी मार्चमध्ये 3.29 कॅरेटचा ब—ाऊन डायमंड सापडला होता. हे पार्क हिर्यांसाठीच प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेकांना हिरे सापडत असतात. अनेक लोक हिरा शोधण्यासाठी याठिकाणी दूरवरूनही येतात. आता या चिमुरडीला आपल्या वाढदिवशीच हा हिरा सापडल्याने अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.