पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी ऐतिहासिक कामगिरी करत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. नीरज चोप्रा लॉसने डायमंड लीग 2022 जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राने 89.08 मीटरच्या पहिल्या थ्रोने लॉसने डायमंड लीग जिंकली. नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते. अंतिम फेरीत नीरजने 88.13 मीटर अंतरापर्यंत भालाफेकून रौप्यपदक कमावले होते. (Lausanne Diamond League)
हरियाणातील पानिपतजवळील खंडारा गावात राहणारा नीरज चोप्रा डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय ठरला. चोप्राच्या आधी, डिस्कस थ्रोअर खेळाडू विकास गौडाने डायमंड लीग संमेलनात पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे. गौडा यांनी 2012 मध्ये न्यूयॉर्कमध्ये आणि 2014 मध्ये दोहा येथे दुसऱ्या आणि 2015 मध्ये शांघाय आणि यूजीनमध्ये तिसरे स्थान मिळवले होते.(Lausanne Diamond League)
टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता खेळाडू जेकोब वडलेचने 85.88 मीटरच्या सर्वोत्तम थ्रो करून दुसरे स्थान मिळवले, तर यूएसएच्या कर्टिस थॉम्पसनने 83.72 मीटरच्या सर्वोत्तम थ्रो करून तिसरे स्थान पटकावले. नीरज चोप्राने 7 आणि 8 सप्टेंबर रोजी झुरिच येथे डायमंड लीग फायनलसाठी देखील पात्रता मिळवली. त्याने 85.20 मीटर पात्रता गुण मोडून बुडापेस्ट, हंगेरी येथे 2023 वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी देखील पात्रता मिळवली आहे.
नीरज चोप्राला जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती. फायनलमध्ये नीरजही मांडीला पट्टी बांधताना दिसला. आता त्याच दुखापतीमुळे नीरजला राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होता आले नाही.