Latest

N D Mahanor Death | ना. धों. यांचे निधन पावसाळ्यात व्हावं हा योग मनाला चटका लावणारा : शरद पवार

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धों. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावं हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. अशा शब्दांत शरद पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार ना. धों. महानोर यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.  ना. धों. महानोर यांनी पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (N D Mahanor Death)

अखेर हा वृक्ष उन्मळून पडला : शरद पवार 

माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धों. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धों. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावं हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो. अशा शब्दात शरद पवार यांनी रानकवी ना. धो. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

समृद्ध वारसा जीवंत ठेवला : सुप्रिया सुळे 

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, " ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. हि आम्हा सर्वांसाठी व्यक्तिगत हानी आहे. महानोरांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात बालकवी आणि बहिणाबाई यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवला. कवितेतून माती, शेती आणि संस्कृतीची नवी ओळख करुन दिली. त्यांच्या 'पानझड', 'तिची कहाणी' 'रानातल्या कवितां' आदी अनेक रचना अजरामर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे साहित्याला मातीशी जोडून ठेवणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला. या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण महानोर कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.

ना. धों. महानोर  यांनी ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (poet, lyricist Namdeo Dhondo Mahanor passes away) ना. धों. महानोर यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. मराठी साहित्य क्षेत्रात ते निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव राहिला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT