Latest

स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज लढ्यातून आली : छत्रपती संभाजीराजे

अमृता चौगुले

नाते (महाड); पुढारी वृत्तसेवा : अगणित वीरांच्या बलिदानातून 1947 साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, हे हुतात्मा भगतसिंहांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते, असे प्रतिपादन रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या दुर्गराज किल्ले रायगडावर सोमवारी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी गडावरील नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांसह त्यांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.त्या वेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती बोलत होते.

शिवभक्तांसह उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती पुढे म्हणाले, 6 जून 1674 रोजी दुर्गराज रायगडवर सार्वभौम स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे पारतंत्र्यात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकविला.

स्वराज्य व स्वातंत्र्याचे मुर्तीमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या साक्षीने व शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे, अशी भावना संभाजीराजे यांनी अखेरीस व्यक्त केली.

यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा शिवप्रेमींच्या गर्जनांनी गडावरील संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

SCROLL FOR NEXT