India@75 : नौदलाच्या माजी मरीन कमांडोजचा उरणमध्ये ‘अंडरवॉटर इंडिपेंडन्स डे’ | पुढारी

India@75 : नौदलाच्या माजी मरीन कमांडोजचा उरणमध्ये 'अंडरवॉटर इंडिपेंडन्स डे'

अलिबाग; जयंत धुळप : भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त भारतीय नौदलातील 13 माजी मरिन कमांडोज यांनी 13 फूट खोल पाण्यात, पाण्याच्या तळाला अनोखे ध्वजारोहण, संचलन आणि राष्ट्रगीत सादर केले. पाण्याखालील राष्ट्रीय ध्वजारोहाण हे पहिलेच ध्वजारोहण असल्याची माहिती या उपक्रमाचे कल्पक नियोजनकर्ते मरिन कमांडो रवींद्र कुलकर्णी यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली.  (India@75)

रायगड जिल्ह्यातील उरण येथील विमला तलावात रविवार १४ ऑगस्ट 2022च्या रात्री १०.३० ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी मध्यरात्री 12.30 या वेळेत 13 फूट खोल पाण्याखाली हा अनोखा अंडरवॉटर इंडिपेंडन्स डे सोहळा संपन्न झाला. यामध्ये उपक्रमाचे कल्पक नियोजनकर्ते मरिन कमांडो रवींद्र कुलकर्णी यांच्यासह विनोद कुमार,रामदास काळसे, एन.सी.जे. जीवन,सज्जन सिंग, अनिल घाडगे, भूपेंद्र सिंग, विलास भगत, रामेश्वर यादव, ब्रिजभूषण शर्मा, नंदलाल यादव, रेवण सुंबरे आणि प्रवीण तुळपुळे असे एकुण नौदलाचे १३ माजी मरिन कंमांडोज सहभागी झाले होते.

सन २००३ मध्ये जगातील पहिले अंडर वॉटर मॅरेज मरिन सेंटर वाशी येथे आयोजित केले होते. त्यावेळी आपण चंदन व दिप्ती ठाकूर यांचा संपूर्ण विवाह सोहळा पाण्याखाली केला होता. त्यानंतर आपल्या देशाला अनोखी मानवंदना देण्याच्या हेतूने स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या अंडरवॉटर इंडिपेंडन्स डे सोहळ्याने आयोजन आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे मरिन कमांडो रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

या अंडरवॉटर इंडिपेंडन्स डे सोहळ्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे झेंडावंदन पाण्याखाली केल्यावर तेथेच १३ कंमांडोजनी मानवंदना देऊन संचलन केले. आणि झेंडावंदनानंतर पाण्याखाली झालेले राष्ट्रगीत पाण्याच्या बाहेर उपस्थित असलेल्या सर्वांना आधूनिक ऑडिओ तंत्रज्ञानाद्वारे थेट ऐकता आले. ऑक्सिजन सिलींडर,नोज-फेस मास्क यांचा वापर पाण्यात केला जातो आणि पाण्यातच मात्र जमिनीवर वावरल्या प्रमाणे त्याच शिस्तीत हे संचलन आणि मानवंदना केल्याचे कुलकर्णी यांनी सांगीतले.

हेही वाचा

 

Back to top button