मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, संजय दौंड, दिवाकर रावते, सदाभाऊ खोत, सुरजितसिंह ठाकूर, विनायक मेटे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 7 जुलै रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सभागृहात निरोपावेळी भाषणात उपमुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली.
आता सदाभाऊ खोत खूप बदलले आहेत. त्यांचा पेहराव तर बदललाच; शिवाय त्यांचा पांढरा शर्ट अधिक शुभ्र होत आहे. आता त्या शर्टाची घडी मोडत नाही. आधी आंदोलनामुळे रापलेला त्यांचा चेहरा सभागृहातल्या एसीमुळे उजळला आहे. त्यांचे हे तेज कायम राहू दे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरखळी मारताच सभागृहात जोरदार हशा पिकला.
पवार म्हणाले, शेतकरी संघटनेतून पुढे आलेले सदाभाऊ भाजपमध्ये आले आणि राजू शेट्टींसोबतचा हात सुटला. आता ते एकटेच खूप पुढे जात आहेत. अलीकडे आमच्या जयंत पाटील यांच्याशी खूप वेळ बोलत असतात. आधी या दोघांचे फार काही जमायचे नाही. आता इतका वेळ काय बोलत असतात कुणाला माहीत! पवार यांच्या या टोलेबाजीवर खोत यांना हसू आवरता येत नव्हते.