पुढारी ऑनलाईन डेस्क: तीन शेती कायद्यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या महापंचायतीला येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवाल तर फोडून काढू असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.
'महापंचायतीसाठी किती लोक येतील, हे सांगणं शक्य नाही.
मात्र, मोठ्या संख्येनं लोक पोहोचतील एवढं नक्की. शेतकऱ्यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
कोणीही जर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू,' असा इशारा टिकैत यांनी दिला.
पंजाबमधून सुमारे दोन हजार शेतकरी मुझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे.
ते अमृतसरहून पहाटे ४ वाजता, जालंधरमधून सकाळी ५ वाजता आणि लुधियानाहून सकाळी ६ वाजता एक्स्प्रेस ट्रेन पकडतील,
असे टिकैत यांनी सांगितले.
टिकैत म्हणाले, 'दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळावरून ४०० ते ५०० शेतकरी महापंचायतीकडे रवाना होतील.
टिकरी आणि गाजीपूर सीमेवरून शेतकरी बसने मुझफ्फरपूरसाठी निघत आहेत. शुक्रवारी रात्री दोन बस मुझफ्फरनगरसाठी रवाना झाल्या,
रविवारी सकाळी आणखी दोन बस शेतकऱ्यांना घेऊन निघतील.
महापंचायतीसाठी गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. शेतकऱ्यांना मुजफ्फरनगरला नेण्यासाठी ५०० बसेस भाड्याने घेण्यात आल्या आहेत.'
'महापंचायत सुरळीतरित्या पार पडावी, याची जबाबदारी ५ हजार स्वयंसेवकांना देण्यात आली आहे.
तसेच शेतकऱ्यांना मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. शिवाय काही अडचण आल्यास सर्व स्वयंसेवकांना आपत्कालीन क्रमांक देण्यात आला आहे, असे राकेश टिकैत म्हणाले.
ही महापंचायत निवडणुकीशी संबधित नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. येथे विजेची बिले भरमसाठ आली आहेत आणि उसाचे दर गेल्या कित्येक वर्षांपासून जैसे थे आहेत.
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षीपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धरणे आंदोलन करत आहेत.
२६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चावेळी मोठा हिंसाचार झाला होता.
सरकारने हे तीनही कायदे मागे घ्यावेत अशी मागणी लावून धरल्याने सरकारची कोंडी झाली आहे.
आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत या आंदोलनाचा परिणाम दिसण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा :