Latest

शाहूवाडीत राजू शेट्टी यांची लोकसभेची बीजपेरणी !

निलेश पोतदार

सरुड : चंद्रकांत मुदूगडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शाहूवाडी तालुक्याच्या दुर्गम, डोंगरी भागातील मूलभूत नागरी समस्यांना हात घालून निष्क्रिय सरकारी बाबूंविरोधात रान उठविण्यात यश मिळवले. त्यांनी महसूल, वन्यप्राणी आणि वीज पीडित वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना सोबत घेऊन तहसील कार्यालयावर नुसती धडक मारली नाही तर येथील सरकारी बांबूना मोर्चासमोर बोलावून त्यांच्या गैरकारभाराचा देखतच पंचनामा केला. यावेळी राजू शेट्टी यांनी हातचे न राखता केलेल्या प्रश्नांच्या भडीमाराने संबंधित अधिकारी भांबावून गेलेले पाहायला मिळाले. त्याचवेळी अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे खवळलेल्या नागरिकांना आवर घालण्यासाठी राजू शेट्टी यांनाही तारेवरची कसरत करावी लागली. या निमित्ताने का होईना स्वाभिमानीकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शाहूवाडीत बीजपेरणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान भूमीपुत्रांचा कौफियत मोर्चा यशस्वी होण्यासाठी राजू शेट्टी यांनी गेल्या दोन महिन्यांपासून शाहूवाडी तालुक्यावर लक्ष केंद्रित केले होते. स्वतः त्यांनी तीनचार वेळा मुक्काम ठोकत वाड्यावस्त्यांवर संपर्कदौऱ्याची आखणी केली होती. शिवाय त्यांचे पुत्र सौरभ शेट्टी, स्वीय सहायक स्वस्तिक पाटील, विश्वासू शिलेदार सागर संभूशेटे यांनीही अधूनमधून तालुक्यात चक्कर मारून लोकांमधील अस्वस्थतेला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच दोघा पिता पुत्रांनी घरगुती समारंभात हजेरी लावून येथील जनतेला आपलेसे करण्याची कसर सोडलेली नाही. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकताना आपण 'एकला चलो रे' भूमिकेवर ठाम असल्याचे व पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कोणत्याही आघाडीत सामील न होण्याचा ठराव संमत केल्याचे लोकांच्या मनावर बिंबविण्यात यशस्वी ठरले आहेत. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून आघाड्यांशी संगत केली, मात्र वाईट अनुभव आला हे सांगताना भाजपने संघटनेत फूट पडल्याचे शल्य शेट्टींना जिव्हारी लागल्याचे जाणवते.

'स्वाभिमानी'कडून शाहूवाडी तालुक्यातील वाड्यावस्त्यांच्या दौऱ्यावर गेल्या दोन महिन्यात भर देण्यात आला. यासोबतच आंबा येथे संघटनेचे कार्यकर्ता अभ्यास शिबीर आयोजित करून लोकसभेच्या दृष्टीने महत्वाची बीजपेरणी केली आहे. हे पीक काढून खळ्यावर मळणी करेपर्यंत स्वाभिमानीच्या शाहूवाडीच्या लालकाळ्या मातीतील जोरबैठका सुरूच राहणार आहेत, हे कोणी वेगळे सांगायला नको. मात्र इथल्या भोळ्याभाबड्या अडाणी लोकांना सरकारी बाबू अजूनही त्रास देवून वेठीस धरणार असतील तर मात्र मी कपड्यांची बॅग भरून येऊन या सरकारी बाबूंच्या छाताडावर तांडव करायला मागेपुढे पाहणार नाही, हा राजू शेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भरलेला सज्जड दम, हा दुर्गम, डोंगरी भागातील लोकांना दिलासा देणारा ठरला आहे. किंबहुना त्याच आशाळभूत नजरेने ही सामान्य लोकं त्यांच्याकडे 'मसीहा' म्हणून पाहत आहेत.

भूमीपुत्रांच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धाव घेणार 

तालुक्यातून जाताजाता त्यांनी हा मोर्चा म्हणजे फक्त सुरुवात आहे. स्थानिक प्रशासनाच्या मर्यादा पाहता भूमीपुत्रांची कैफियत आपण जिल्हाधिकारी व्हाया वनमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या दरबारात घेऊन जाणार असल्याचे आणि न्यायासाठी झगडायची तयारी असल्याचे नेहमीच्या शैलीत सांगून लोकांच्या आशा-निराशेला शेट्टींनी एकप्रकारे फुंकर घातली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT