Latest

लोकमान्य टिळक : टिळकांची भूमिका साकारणे आव्हानात्मक-क्षितिज दाते

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकमान्य टिळक या मालिकेत अभिनेता क्षितीज दाते टिळकांचे पात्र साकारतो आहे. ही भूमिका किती आव्हानात्मक होती. याबद्दल क्षितीजने आपले अनुभव शेअर केले आहेत. या मालिकेबद्दल बोलताना क्षितीज म्हणाला- या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर असं की ही मालिका लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची चरित्रगाथा आहे. स्वराज्याबद्दल आग्रही असणारे लोकमान्य टिळक महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्मलेलं असामान्य व्यक्तीमत्त्व होते आणि आजही त्यांचं स्थान मराठी समाजमनातून अजिबात तसूभरही कमी झालेलं नाही. मी या मालिकेसाठी अभ्यास करतोय, त्यातून मला कळतंय की शाळेत जे शिकवलं गेलं आणि त्यानंतर वाचलं गेलं त्याच्या फार पलीकडचा मोठा अवाका टिळकचरित्राचा आहे. मला खात्री आहे की झी मराठी वाहिनी आणि दशमी क्रिएशन्स यांच्या एकत्रित प्रयत्नातून लोकमान्य टिळकांची चरित्रकथा खूप चांगल्या पद्धतीने दाखवली जाणार आहे. मी या मालिकेचा महत्त्वपूर्ण भाग आहे याचा मला खूप आनंद वाटतो आणि ही मालिका सध्याच्या मराठी मालिकांच्या विश्वात प्रभावी ठरणार आहे.

आपल्या भूमिकेबद्दल तो म्हणाला- या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर ही अशी भूमिका मी पहिल्यांदाच करत आहे. ही व्यक्तिरेखा अतिशय आव्हानात्मक आहे. लोकमान्य टिळकांबद्दल आपल्याला एवढंच माहित असतं की ते अतिशय कडक आणि शिस्तप्रिय होते. पण त्याशिवाय त्यांचे त्यांच्या पत्नीशी असलेलं नातं कसं होतं, विद्यार्थ्यांशी असलेलं नातं, समाजाच्या विविध स्तरातील लोकांशी असलेलं त्यांचं नातं, त्यांच्या पिढीतले त्यांचे जे आदर्श होते त्यांच्याबरोबरचं त्यांचं नातं, याबद्दल मला नव्याने खूप काही शिकायला मिळालं, त्याबद्दल वाचायला मिळालं. मालिकेच्या निमित्ताने पुन्हा मुळापासून वाचन झालं. ही भूमिका माझ्यातील अभिनयकलेला आव्हान देणारी आहे.

सहकलाकाराबद्दल बोलताना क्षितीज म्हणाला- खरं सांगायचं झालं तर मी खूप आधी पासून स्पृहाचा फॅन आहे. त्यामुळे ती आहे आता सोबत म्हणून मला प्रचंड आनंद झाला आहे. मी तिच्यासोबत शूटिंग सुरू होण्याची वाट पाहत आहे. मी तिचे या आधीचे चित्रपट, मालिका आणि नाटकं पाहिली आहेत. आणि ते पाहताना मला खूप मजा आली आहे. तिचं काम खूप अप्रतिम आहे. आणि धर्मवीर पाहिल्यानंतर तिने स्वतः मला फोन करून माझ्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे दोन सहकलाकारांमध्ये चांगला समन्वय असणं चांगलंच आहे. आणि मी तिच्यासोबत काम करायला उत्सुक आहे.

त्याला आलेल्या अनुभवाबद्दल तो म्हणाला- मी गेले १०-१२ वर्षांपासून नाटक करतोय. सिनेमामध्ये सुद्धा काम केले. मला असं सतत वाटतं की मी जे काय नवीन काम करतो ते माझ्या जीवनात काय बदल घडवून आणणार आहे, याचं मला फार महत्व वाटतं. इतकी वर्ष काम केल्यानंतर, इतक्या चांगल्या वाहिनीवरती अशी मालिका करायला मिळणं हा आनंद आणि जबाबदारी दोन्हीही आहे. ही जरी सुरुवात असली तरी ही मालिका खरोखरच प्रेक्षकांची मने जिंकेल असा मला विश्वास आहे. आणि तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण असेल. जेव्हा प्रेक्षकांना ही मालिका आणि माझे काम आवडेल.

SCROLL FOR NEXT