जिल्ह्याला प्रवरेचे महत्त्व उशिरा कळते : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

जिल्ह्याला प्रवरेचे महत्त्व उशिरा कळते : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात बांधा, वापरा व हस्तांतर (बी. ओ. टी.) करा तत्वावरील कामांची सुरूवात आपण केली. त्यावेळेस बाहेरच्या लोकांनी मोठे आरोप केले. परंतु हा उपक्रम आज जिल्ह्याच्या विकासाचा एक भाग बनला. त्यामुळे जिल्ह्याला प्रवरेचे महत्व उशिरा कळते, असा स्पष्ट खुलासा राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धविकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करताच उपस्थितांनी भरभरून दाद दिली. श्रीरामपूर शहर व तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काल दिवसभर श्रीरामपूर शहरात आले होते. येथील पंचायत समिती प्रांगणात आयोजित बांधा, वापरा व हस्तांतर (बीओटी) तत्वावरील कार्यालय, कॉन्फरन्स हॉल व शॉपिंग सेंटर भुमिपुजनप्रसंगी ना. विखे पाटील बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ. लहू कानडे यांनी भूषविले. यावेळी भारतीय जनता पार्टी, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दिपकराव पटारे, जि. प. सदस्य शरदराव नवले, नितीन दिनकर, प्रकाश चित्ते, सिद्धार्थ मुरकुटे, नानासाहेब पवार, नाना शिंदे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले, मारूती बिंगले, बाळासाहेब तोरणे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक भाषणात शरदराव नवले व दिपकराव पटारे यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासात विखे कुटुंबियांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. या कुटुंबियांनी अनेकांना प्रेम दिले, आधार दिला. श्रीरामपूर तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान आ. कानडे यांनी श्रीरामपुरात थांबलेले कामे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरू केल्याचा उल्लेख केला.
या पार्श्वभुमीवर बोलताना ना. विखे पुढे म्हणाले, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भुमिका आजपर्यंत विखे कुटुंबियांनी घेतली आहे. राजकारणात माझ्या सुरूवातीच्या काळात बीओटी तत्वावर सर्वप्रथम जिल्ह्यातील राहाता येथे शाळेच्या बांधकामाचे काम केले. त्यानंतर साई संस्थानच्या मदतीने शिर्डी येथे जिल्हा परिषदेची शाळा बांधली.

राहाता तालुक्यातील सात्रळ, कोल्हार, लोणी येथे शाळांचे कामे होत आहे. प्राथमिक शाळेमध्ये मुलभूत शिक्षणाचे काम होते. त्यामुळे शाळेच्या कामांना प्राधान्यक्रम देण्याची भूमिका आपण केली आहे. जिल्ह्यात 42 ठिकाणी या पद्धतीने कामे होवू शकतात. तसा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले. आभार माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी मानले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.

ना. विखे संवेदनशील नेते : आ. कानडे

आ. लहू कानडे यांनी आपल्या भाषणात ना. राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्यातील मातब्बर नेते आहेत. त्यांनी श्रीरामपुरात थांबलेले कामे सुरू केले. जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी असताना त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी अकारीपिडीतांच्या प्रश्नावर सभागृहात पोटतिडकीने भूमिका मांडली. गायरान जमिनीच्या प्रश्नावर गोरगरीबांचा आक्रोश ऐकला. त्यामुळे ते संवेदनशील नेते असल्याचा उल्लेख करताच कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा गजर झाला.

अकारीपडित जमिनींचा प्रश्न सुटणार : ना. विखे

राज्यात शेती महामंडळाचा प्रश्न गंभीर होता. त्यावेळी खंडकरी शेतकर्‍यांचे नेते माधवराव गायकवाड यांचेसह पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी मोठा लढा दिला. पद्मभूषण विखे पाटलांनी तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायण यांची स्वाक्षरी यांची स्वाक्षरी घेऊन खंडकरी शेतकर्‍यांना न्याय दिला. त्याचप्रमाणे अकारीपडीत जमिनीचा प्रश्न गंभीर आहे. त्यांची न्याय मागणी असून महसुलमंत्री म्हणून हा प्रश्न सुटणार असल्याची स्पष्ट ग्वाही ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राज्यातील शासन लोकाभिमुख : ना. विखे

आ. लहु कानडे यांनी आपल्या भाषणात श्रीरामपूर तालुका क्रीडांगणासाठी निधी मंजूर आहे. परंतु जागेची अडचण असल्याचे सांगितले. त्यावर बोलतांना ना. विखे यांनी राज्यातील शासन लोकाभिमुख आहे. या सरकारने गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास स्थगिती घेतली आहे. भुमिहीन, आरक्षित व प्रधानमंत्री आवास योजनेतील गरीबांच्या निवार्‍याचे अतिक्रमण काढणार नाही. तसेच तालुका क्रीडा संकुलाचा निधी 5 कोटी वरून 8 कोटी केला. क्रीडांगणासाठी महिनाभरात जागा देणार असल्याची घोषणा करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Back to top button