पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचालकांची लूट | पुढारी

पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकचालकांची लूट

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांच्या चालकांना ’तुमच्या गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला आहे, पैसे द्या नाहीतर चौकीला गाडी घ्या, गुन्हा दाखल करतो’ असे म्हणत रात्रीच्या वेळेस चारचाकी आलिशान वाहनातून आलेल्या दोघांकडून लुटण्याचा प्रकार गेली काही दिवस चालू आहे. रावणगाव औट पोस्ट व भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीच्या मध्यभागी असलेल्या स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे गेल्या अनेक दिवसांपासून इनोव्हा गाडीतून पाटील नावाचा भामटा पोलिस अधिकार्‍याच्या वेशात व रुबाबात येऊन दमदाटी करत लुटत आहे.

रावणगाव परिसरातील एक चालक आपल्या हुशारीने इनोव्हा कारमधून आलेल्या या दोघांच्या तावडीतून सुटला. आपल्या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त माल नाहीच, माझ्यावर गुन्हा दाखल कराच, घ्या रावणगाव चौकीला किंवा भिगवण पोलिस स्टेशनला गाडी, मी माझ्या पत्रकार मालकांना बोलावतो, असे त्याने दटावताच या दोन भामट्यांनी चारचाकी गाडीतून पळ काढला.

पोलिस असल्याचे धमकावत महाराष्ट्रासहीत इतर राज्यांतील वाहनचालकांना गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात लुटण्याचे धंदे चालू आहेत. चालकांना लुटताना कधी रावणगाव पोलिस चौकीचे तर कधी भिगवण, इंदापूरचे पोलिस असल्याचे सांगत वरील दोघेही वाहनचालकांची लूट करत आहेत. याकडे पोलिस प्रशासन व महामार्ग पोलिसांनी लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.

Back to top button