Latest

रेल्वे : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

निलेश पोतदार

रावसाहेब दानवे-पाटील,
रेल्वे राज्यमंत्री

रेल्वेमुळे विशेषत : विविध राज्ये आणि विविध भाषिक बांधव एकमेकांच्या जवळ आले. देशातील विविध राज्यांची संस्कृती, परंपरा, भाषा, संस्कारांचे आदान-प्रदान रेल्वेमुळेच सहजसाध्य झाले. देशाच्या वैविध्यपूर्व भौगोलिक स्थितीतही भारतीय संस्कृतीचा प्रवास रेल्वेमुळे अधिकच सुलभ झाला.

भारतीय रेल्वेकडे सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे सुकर साधन म्हणून पाहण्यात आले आहे. मोदी सरकारकडून प्रवाशांच्या सुरक्षेवर आणि सोयीसुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशात सर्वत्र मालवाहतूक कॉरिडोरचे जाळे विणण्याचे काम देखील रेल्वेकडून केले जात आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षांत रेल्वेसेवेचा आणि एकंदर देशाच्या प्रवासाचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्याशी दै. 'पुढारी'चे दिल्लीतील राजकीय प्रतिनिधी सुमेध बन्सोड यांनी साधलेला खास संवाद.

प्रश्न : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वाटचालीविषयी आपल्या काय भावना आहेत? भारतीय स्वातंत्र्याची बलस्थाने, वेगळेपण, वैशिष्ट्ये काय आहेत आणि गेल्या 75 वर्षांचा हा प्रवास आपल्याला कसा वाटतो?

दानवे-पाटील : इंग्रजांचे राज्य असताना प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच उद्दिष्ट होते आणि ते म्हणजे, इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या जोखडातून देशाला स्वतंत्र करण्याचे! अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानानंतर 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु, 150 वर्षांहून अधिकच्या काळात इंग्रजांनी येथील संसाधनांचे शोषण केल्यामुळे स्वतंत्र भारतासमोर विकासाचा फार मोठा प्रश्न उभा ठाकला होता. परंतु,आपल्या देशाला सर्वांगाने उन्नत करण्यासाठी केंद्र सरकारने काम करण्यास सुरुवात केली. यात सर्वात महत्त्वाचा वाटा दळणवळणाच्या क्षेत्राने आणि विशेषकरून रेल्वे विभागाने उचलला.

पंचाहत्तर वर्षांनंतर मागे वळून बघितल्यावर आज रेल्वेचे जाळे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून पूर्वांचलपर्यंत सर्वच स्तरात निर्माण झालेले दिसते. या विस्तारासोबत रेल्वे विभागाने देशाच्या अर्थव्यवस्थेत फार मोठे योगदान दिल्याचे दिसून येते. रेल्वेमुळे विशेषत: विविध राज्ये आणि विविध भाषिक बांधव एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात. अशात विविधतेत एकता निर्माण करीत देशातील विविध राज्यांची संस्कृती, परंपरा, भाषा, संस्कारांचे आदान-प्रदान या रेल्वेमुळेच सहजसाध्य झाले. देशाच्या वैविध्यपूर्व भौगोलिक स्थितीतही भारतीय संस्कृतीचा प्रवास रेल्वेमुळे अधिकच सुकर झाला.

प्रश्न : आपण दीर्घ काळापासून राजकारणात व समाजकारणात कार्यरत आहात. स्वातंत्र्यानंतरचे सुरुवातीचे दिवस आणि आजचे दिवस यामध्ये आपल्याला काय बदल जाणवतो? भारतीय लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ, सुद़ृढ झालेली आहे का? त्यामधील आव्हाने कोणती आहेत? मतदारांच्या, शेतकर्‍यांच्या आणि सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षांना राज्यसंस्था, सत्ता उचित न्याय देऊ शकली आहे असे आपणास वाटते का आणि नसल्यास त्याची कारणे काय असू शकतात?

दानवे-पाटील : स्वातंत्र्योत्तर काळावर द़ृष्टिक्षेप टाकल्यास असे लक्षात येते की, आपला देश हा अनेक बाबतीत जागतिक स्तरावर मागासलेला होता आणि अनेक बाबतीत हे प्रकर्षाने दिसून येत होते. पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्र अथवा रोजगाराच्या क्षेत्रात देशाची स्थिती फारशी समाधानकारक नव्हती. अशात भारताला गरुडझेप घेणे अपेक्षित होते. त्या द़ृष्टीने आजचा विचार केला तर, जागतिक अर्थव्यवस्थेत आज पाचव्या क्रमांकावर भारतीय अर्थव्यवस्था पोहोचली आहे.

देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहे. क्रीडा क्षेत्रात भारतीय खेळाडू प्रभावी कामगिरी करीत आहेत. ऑलिम्पिकसारख्या जागतिक ख्यातीच्या स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंची उत्तुंग कामगिरी बघायला मिळत आहे. कृषी क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामुळे देशांतर्गत अन्नधान्याचे उत्पादन वाढले आहे. अनेक क्षेत्रांत विशेषत: बँकिंग, कृषी तसेच श्रमिकांच्या क्षेत्रात कायद्यांमध्ये पण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातदेखील अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे देशात परकीय गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. आणि याचे अमूल्य योगदान देशाच्या विकासात मिळत आहे, हे नाकारता येणार नाही.

परंतु, हे सर्व करीत असताना, देशवासीयांच्या इच्छा-आकांक्षांची पूर्तता करणे हे प्रत्येक सरकारचे नैतिक कर्तव्य असते आणि याची खर्‍या अर्थाने जाणीव ठेवली ती आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने. वास्तविक, भारतासारख्या विशालकाय आणि प्रगतिशील देशात ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असायला हवी होती; परंतु याची जाणीव सत्तर वर्षांत सर्वप्रथम स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि आता मोदींच्या नेतृत्वाने करून दिली आहे. भारतात आता ईव्हीएमच्या सहाय्याने सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात. केंद्राकडून राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर आमच्या सरकारकडून केला जात असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. हे सर्व चित्र सकारात्मकता निर्माण करणारे आहे. या सकारात्मकतेने देशवासीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरचा विश्वास वाढला आहे, हेच अधोरेखित होत आहे.

प्रश्न : स्वातंत्र्यानंतरच्या आजवरच्या प्रवासात आपण अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण झालो आहोत. मात्र, शेतकर्‍यांची स्थिती अद्यापही त्या तुलनेने सुधारलेली नाही याची कारणे काय आहेत? आपल्या मोदी सरकारने गेल्या 5-7 वर्षांत यासंदर्भात उचललेल्या पावलांचे परिणाम काय दिसून येत आहेत?

दानवे-पाटील : शेतकर्‍यांची स्थिती पूर्णपणे बदलेली नाही, ही बाब तेवढीच खरी आहे. याचे कारण, आजवर शेतर्‍यांनी उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत नव्हता. शेतकरी आणि ग्राहकांमध्ये असणारे मध्यस्थ नफाखोरी करीत असल्याने शेतकर्‍यांंसोबतच ग्राहकांचेही शोषण होत होते. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा ध्यास घेत शेतकर्‍यांच्या विकासात अडसर ठरणार्‍या समस्यांवरच थेट घाव घातला.

केंद्र सरकारने कृषी सुधारणा कायदा आणल्याने शेतकर्‍यांच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. या नव्या कायद्यामुळे शेतकरी त्याचा शेतमाल त्याच्या मर्जीनुसार हव्या त्या बाजारपेठेत हव्या त्या ग्राहकांना चांगल्यातल्या चांगल्या दरात विकू शकतो. हे शक्य झाल्याने शेतकर्‍यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. शेतकर्‍यांच्या स्थितीत सुधारणा होण्याची ही ऐतिहासिक सुरुवात आहे. शेती क्षेत्रामध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळात गुंतवणूक वाढली आहे.

2014 नंतर सुधारित पीक विमा योजना आणण्यात आल्याने पीक पद्धतीत बदल घडू लागले आहेत. याचा फार मोठा व थेट फायदा शेतकर्‍यांना होत आहे. 2014 नंतर पिकांच्या हमी भावातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, हे विशेष उल्लेखनीय. शेतकर्‍यांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार कटिबद्ध असून तळागाळातील अखेरच्या शेतकर्‍यापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचे काम केले जात आहे. कृषी सुधारणांमुळे शेतकर्‍यांसह ग्राहकांचाही फायदा होणार आहे. मध्यस्थ या प्रक्रियेतून बाहेर पडतील आणि शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळेल, यात दुमत नाही.

प्रश्न : आज आपण ज्या रेल्वेमंत्रालयाचा कार्यभार सांभाळत आहात, त्या रेल्वेचा आजवरचा इतिहास कसा राहिला आहे? खासकरून मुंबईचा विचार करता रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणारे शहर आहे. मात्र, देशाच्या या आर्थिक राजधानीतील नागरिकांचा रेल्वेप्रवास आजही तितकासा सुखकर नाहीये. यासंदर्भात आपला काय द़ृष्टिकोन आहे?

दानवे-पाटील : पंतप्रधानांनी माझ्याकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी नुकतीच सोपवली आहे. साहजिकपणे महाराष्ट्रातील जनतेच्या माझ्याकडूनच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे. या अनुषंगाने रेल्वेचे अर्थकारण समजावून घेणे आवश्यक आहे. रेल्वे हा सेवा देणारा विभाग आहे. यात तिकिटांचे दर प्रवाशांकडून घेण्यासाठी नेहमीच अडचणी येत असतात. रेल्वेची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी 'मालवाहतूक' हाच एकमेव मार्ग आहे. जास्तीत जास्त मालवाहतूक करणे यासाठी आवश्यक आहे.

प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत मालवाहतुकीतून रेल्वेला अधिक उत्पन्न प्राप्त होते. यासाठी देशभरात 'समर्पित मालवाहूक कॉरिडोर' उभारणे महत्त्वाचे ठरणार आहे. या दिशेने रेल्वेने पाऊल टाकले असून जास्तीत जास्त कॉरिडोरची उभारणी केली जात आहे. या माध्यमातून उत्तरेकडून बंगालपर्यंत आणि दिल्लीपासून मुंबईपर्यंत त्याचे जाळे पसरले जात आहे. कॉरिडोरसाठी 50 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी मालवाहतूक ही 80 टक्के होती. परंतु, ती आता 30 टक्क्यांवर आली आहे.

एकाच रूळावरून प्रवासी तसेच मालवाहतूक केली जात असल्याने हे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, मालवाहतुकीचा विशेष कॉरिडोर केल्यानंतर रेल्वेचा महसूल वाढेल. सध्या मालवाहतुकीचा सरासरी वेग ताशी 25 किलोमीटर आहे. परंतु, कॉरिडोर पूर्णत्वास आल्यानंतर हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत जाईल. परिणामी रेल्वेचे प्रवासी भाडे न वाढवता ही वित्तीय तूट मालवाहतुकीतून भरून काढण्याचा प्रयत्न राहणार आहे.

उपप्रश्न : याचा प्रवाशांना, विशेषत: मुंबईकरांना कसा फायदा होईल? 

दानवे-पाटील : मालवाहतूक जेवढ्या प्रमाणात वाढेल; तेवढ्या प्रमाणात रेल्वेची वित्तीय तूट कमी होईल. यामुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवण्याचा मार्ग अधिक सुकर होईल. राहिला प्रश्न मुंबईचा. तर, मुंबईसह राज्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा अद्ययावत केल्या जातील. स्वयंचलित पायर्‍या, प्लॅटफॉर्मवरील प्रवासी शेडची लांबी वाढवणे, स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता लोकलची संख्या वाढवण्याच्या अनुषंगाने सकारात्मक कामे केली जातील. याद़ृष्टीने लवकरच मी मुंबईचा दौरा करणार असून रेल्वेने प्रवास करीत प्रवाशांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण आणि राज्यातील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकणात अतिवृष्टी झाल्याने कोकणवासीयांचे बरेच नुकसान झाले आहे. अशात मुंबई आणि कोकणात रेल्वे वाहतूक खोळंबली होती. रेल्वे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली. या अनुषंगाने कोकणातील रेल्वेच्या पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यासाठी आणि कोकणवासीयांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करीत आहे.

प्रश्न : आपल्या सरकारने रेल्वेचा कायापालट करण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. त्याविषयी काय सांगाल?

दानवे-पाटील : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे विभागाने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. मागील सात वर्षांत उपनगरीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे विद्युतीकरण 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. विशेष म्हणजे कोरोना महारोगराईच्या काळात रेल्वे विभागाने न थकता सर्वसामान्यांसाठी बरीच मेहनत घेत ऑक्सिजनची कमीत कमी वेळात वाहतूक करण्यासारखे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. या काळात देशांतर्गत मोठ्या प्रमाणात मालवाहूक करण्यात आली.

विविध राज्यांमध्ये रेल्वेमार्फत अन्नधान्य व भाजीपालादेखील पोहोचवण्यात आला. महारोगराईदरम्यान द्रव्यरूपी वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्याठी चालवण्यात आलेल्या 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'मुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले. देशाच्या एका कोपर्‍यापासून तर दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत वैद्यकीय ऑक्सिजनचा वेळेत पुरवठा करण्यात रेल्वे विभाग यशस्वी ठरला, यात दुमत नाही. दूध दुरंतो नुकतीच राजधानीत पोहोचली आहे. अशाच प्रकारे शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव देण्यासाठी चालवण्यात येणारी 'किसान रेल्वे' देखील महत्त्वाची कामगिरी बजावत आहे,

या आणि अशाप्रकारची महत्त्वाची कामे रेल्वेकडून करण्यात येत आहेत आणि भविष्यातही केली जातील. दरम्यान, देशभरात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे पसरले आहे. एक पदरी रेल्वेमार्गाचे दुपदरीत आणि दुपदरी रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण केले जात आहे. रेल्वेगाड्या वेळेवर धावतील या अनुषंगाने प्रयत्न केले जात आहेत. लोहमार्गांची देखरेख तसेच व्यवस्थितीकरण केले जात आहे. हायस्पीड रेल्वे जास्तीत जास्त प्रमाणात सोडल्या जात आहेत.

जनतेकडून येणार्‍या सूचनांवर तत्काळ अंमलबजावणी करून त्याच्या समस्येचे निराकरण केले जात आहे. नवीन गाड्या सोडणे, नवीन थांब्यांची संख्या वाढवणे, विविध सुविधा पुरवणे, स्वच्छ व निरोगी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे यांसारख्या आणि इतरही आनुषंगिक सुविधांसाठी रेल्वे नेहमी कटिबद्ध होती, आहे आणि राहील.

पहा व्हिडिओ : नीरज चोप्राच्या सुवर्णमय कामगिरीनंतर पीएम मोदींची 'फोनाफोनी'!!

https://youtu.be/r-lG9gBXOsA

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT