नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मोदी पवार भेट झाल्याने देशातील राजकारणात खमंग राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहे.
ही नव्या समिकरणाची नांदी तर नाही ना, याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे केंद्रातील दोन वरिष्ठ मंत्र्यांनी अलीकडेच पवार यांची भेट घेत विविध विषयांवर खलबते केली होती.
मोदी यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान अनेक राष्ट्रीय विषयावर चर्चा झाल्याचे ट्विट पवार यांनी केले आहे.
दरम्यान, शरद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत. ते कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे ते जेव्हा पंतप्रधानांना भेटतात तेव्हा त्यात राजकारण का काढता?, असा सवाल करतानाच पवार अधूनमधून पंतप्रधानांना भेटत असतात.
त्यामुळे यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी रविवारी पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे.
सर्वपक्षीय बैठकीआधीच मोदी-पवार भेट झाल्याने या भेटीला महत्व आले आहे.
बैठकीत राष्ट्रीय विषयांवर चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले आहे, तथापि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली होती.
त्या भेटीपाठोपाठ खुद्द पवार यांनी पंतप्रधान कार्यालयात जाऊन मोदी यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उत आला आहे.
दरम्यान कृषी कायद्यात सुधारणा करावी, सहकार क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेले नवे मंत्रालय, या क्षेत्रासमोरच्या अडचणी, बँकिंग क्षेत्रासमोरील अडचणी आदी मुद्द्यावर पवार यांनी मोदी यांच्याशी चर्चा केली, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
मराठा आरक्षण तसेच राज्यातील अन्य मागण्या घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली दौरा केला होता. त्यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट घेतली होती.
यानंतर आता महाआघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळेही मोदी-पवार भेटीचा वेगळा अन्वयार्थ काढला जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या काही काळात शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टिप्पणी केलेली आहे. शरद पवार हे आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल असल्याचा टोला पटोले यांनी मारला होता.
केंद्रातले सत्ताधारी पक्षाचे मोठे नेते शरद पवार यांना भेटत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्ली दौरा केल्याने त्यांच्या या दिल्लीवारीचीही चर्चा होत आहे.
फडणवीस यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून सामील झालेल्या नेत्यांची सदिच्छा भेट घेतली होती. फडणवीस यांनी काही वेळ गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरकारभाराच्या तक्रारी त्यांनी शहा यांच्यासमोर मांडल्याची राजधानीत चर्चा आहे.
फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला काही तासही होत नाही तोच मोदी-पवार भेट झाली, हे विशेष.
खासदार राऊत म्हणाले की, पवार-मोदींची राजकीय भेट आहे, असं मला वाटत नाही.
या भेटीत सहकार आणि कृषी क्षेत्रावर चर्चा झाली असेल. शरद पवार हे देशाचे प्रमुख नेते आहेत. सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
ते पंतप्रधानांना भेटतात तेव्हा तुम्ही त्यात राजकारण का काढता? पवार हे मोदींना भेटत असतात. प्रत्येक भेटीत राजकारण असत नाही, असं राऊत यांनी सांगितलं.