पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थावर एसटी कर्मचाऱ्यांकडून हल्ला करण्यात आला. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात जोरदार उमटले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या घटनेवर पुण्यातील भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत, त्यांना कायमस्वरूपी राजकारणापासून सन्यास घेण्याचा सल्ला दिला. जातीय तेढ निर्माण करत, त्यांना अप्रत्यक्षरित्या धमकी दिली. याप्रकरणी माजी आमदार अनिल बोंडे यांच्याविरोधात युवक काँग्रेसच्यावतीने निवेदन देत हडपसर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माजी आमदार अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित दत्तात्रय घुले यांनी निषेध केला आहे. आमदार बोंडे यांच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याविरूद्ध हडपसर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रीतसर तक्रार केली आहे.
या घटनेविरूद्ध मुंबई आणि राज्यातील बऱ्याच ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारीद्वारे पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे की, असे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर लवकरात लवकर कठोर कारवाई करत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.