कोल्हापूर : पत्रकाराला प्राथमिक शाळेतील बाईंनी हेल्मेटने दिला चोप, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

कोल्हापूर : पत्रकाराला प्राथमिक शाळेतील बाईंनी हेल्मेटने दिला चोप, व्हिडिओ व्हायरल

कळे ; पुढारी वृत्तसेवा : पडसाळी (ता.पन्हाळा जि. कोल्हापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेच्या विनयभंगप्रकरणी रामचंद्र बाबू कर्ले (वय ३७ रा.पिसात्री) याच्यावर कळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीत म्हटले आहे, ‘सप्टेंबर २०१९ पासून शाळेत जाताना व परत येताना संशयिताने फिर्यादीकडे अश्लील नजरेने पाहून ‘तुम्ही दिसायला तरुण व सुंदर आहात परंतू माझ्याशी का बोलत नाही’ असे फिर्यादीशी लगट करण्याच्या हेतूने बोलून, अश्लील हावभाव करून, फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्याच्याकडून भविष्यात त्रास होवून जीवितास धोका असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान रामचंद्र कर्ले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पडसाळी शाळेतील शिक्षक वेळेत येत नसलेबाबत पत्रकार म्हणून प्रतिक्रिया घेण्यासाठी गेल्यावर सबंधित महिला शिक्षिकेने हेल्मेट डोक्यात मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी त्या शिक्षिकेवर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्यासोबत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्ले अवाक् झाले. अहो मॅडम ऐका तरी असे ते म्हणत होते. परंतु, मॅडम चिडलेल्या अवस्थेत होत्या त्यांनी कोणाचेही न ऐकता पत्रकारास मारहाण सुरूच ठेवली.

Back to top button