Latest

महापालिकेची आजची महासभा वादळी ठरणार

Shambhuraj Pachindre

सांगली पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची सोमवार, दि. २० रोजी होणारी महासभा वादळी ठरणार असल्याचे दिसत आहे. बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच ऐनवेळच्या विषयावरून महासभेत वादळी चर्चा होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महासभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपची स्वतंत्र पार्टी मीटींग झाली.

महासभेत आता मंजूर, मंजूर नाही; सर्व विषयावर खुल्या चर्चेसाठी आग्रही राहणार', असे ठासून सांगत काँग्रेसने आपला पवित्रा स्पष्ट केला आहे. भाजपनेही यापूर्वीच्या महासभांमधील ऐनवेळेचे विषय उपस्थित करून महासभेत फटाक्याची माळ लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस व भाजपची ही भूमिका पाहता महासभा वादळी होणार. राष्ट्रवादीची कसोटी लागणार हे स्पष्ट आहे.

मिरज – बेडग रोडवरील बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प कोकण केअर एंटरप्राइजेसला चालविण्यास देण्याच्या ठेक्याचा ठराव करताना राष्ट्रवादीने विश्वासात घेतले नसल्याचा आरोप काँग्रेसने यापूर्वीच केला आहे. घनकचरा वाहतुकीकरिता 14 व्या वित्त आयोगातून इंधन, वंगण यासाठी खर्चास मान्यता देण्याच्या विषयालाही काँग्रेसने शासन निर्णयाकडे लक्ष वेधत हरकत घेतली आहे. भूसंपादनाच्या विषयाकडेही काँग्रेसचे लक्ष आहे.

सिंधी मार्केटच्या 51 दुकान गाळ्यांचे भाडे, बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प हे विषय यापूर्वी महासभेत चर्चेला आले नसतानाही महासभेच्या इतिवृत्तात मात्र हा विषय ऐनवेळच्या विषयात दाखल करून घेत ठराव मंजूर केल्याचे दाखवले असल्याचा आरोप भाजपने केलेला आहे. त्यामुळे या विषयावरून तसेच ऐनवेळच्या सर्वच विषयांवरून महासभेत भाजप आक्रमक पवित्रा घेणार हे स्पष्ट आहे.

गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव दाखल करण्यास मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ, घरांवरील आरक्षण उठून गुंठेवारी नियमित करून प्रमाणपत्र देणे, भूसंपादन मोबदला, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम विकास आराखड्यावर चर्चा करून निर्णय घेणे हे विषयही महासभेपुढे आहेत.

बायोमेडिकल वेस्ट, घनकचरा, ऐनवेळेचे विषय गाजणार : राष्ट्रवादीची लागणार कसोटी

विधवा प्रथेविरोधी ठराव; देशातील पहिली मनपा

विधवा प्रथेविरोधात महासभेत सर्वानुमते ठराव होणार आहे. विधवा प्रथेविरोधात ठराव करणारी सांगली ही पहिली महापालिका ठरणार आहे. समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्यासाठी धोरणात्मक निर्णयाचा विषय सभेपुढे आला आहे.

उदरनिर्वाह भत्ता होणार संमत

कोरोनाने पतीच्या निधनाने विधवा झालेल्या महिलांची आर्थिक उन्नती होण्यासाठी बचत गट स्थापन करणे, मनपाच्या विविध विभागामध्ये कामे राखीव ठेवणे , उदरनिर्वाह भत्ता देण्याचा विषयही महासभेत संमत होईल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT