पुणे ; पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरोधात पुण्यातील शिवाजीननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवाराची बदनामी केल्याप्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुणे जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस संगीता तिवारी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पायल रोहतगी व व्हिडिओ तयार करण्यात आलेल्या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी देखील वादग्रस्त ट्विट करुन पायल रोहतगी चर्चेत राहिलेली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबीय, काँग्रेस परीवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडिओ तयार करुन तो सोशल मिडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला.
त्यातून हिंदू -मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
संगीता तिवारी यांनी सुरुवातीला सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती.
सायबर पोलिसांनी ती शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पायल रोहतगीनं २००२ मध्ये 'ये क्या हो रहा है' या चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती. नंतर चित्रपटांमध्ये विशेष यश मिळू शकले नाही. पायलने कुस्तीपटू संग्राम सिंगसोबत लग्न केले आहे.
तिने २० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि बिग बॉसपासून ते खतरों के खिलाडीपर्यंतच्या अनेक शोमध्येदेखील ती सहभागी झाली आहे. पायल तिच्या सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे चर्चेत असते.
व्हिडीओ बनवूनही ती याबद्दल बोलत असते. तिचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
पायलनं कास्टिंग काउचबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. बंगालमधील निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचारावर पायलने पोस्ट शेअर केली होती.
तसेच कंगनाचे ट्विटर अकाउंट बंद केल्यावर पायलने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर ट्विटरने आपत्तिजनक पोस्ट शेअर केल्यामुळे तिचे अकाऊंटही बंद केले.
हेही वाचलं का ?