Latest

मंत्री असाल तुमच्या घरी, हे सभागृह आहे!

backup backup

मुंबई : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शाळांच्या अनुदानाच्या प्रश्‍नावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत गुरुवारी शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या वादाची ठिणगी पडली. अभूतपूर्व गोंधळ माजला. उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना फैलावर घेतले. 'छाती बडवत कोणाला हातवारे, इशारे करताय? मंत्री आहात तर तुमच्या घरी! हे सभागृह आहे. कुठल्या चौकात उभे राहून बोलताय का? बोलायची ही कोणती पद्धत', असे विचारत त्यांना ताकीद दिली.

विधान परिषदेत प्रश्‍नोत्तराच्या तासात शाळांच्या अनुदानाबाबतचा पहिलाच प्रश्‍न राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. त्रुटी पूर्ततेनंतर शाळांना अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. सभापतींकडे झालेल्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला मान्यता दिली होती. यावर मुख्यमंत्र्यांची सहीसुद्धा झाली होती. मात्र, त्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने अनुदानाचा शासन निर्णय (जीआर) निघू शकला नाही. ही तांत्रिक अडचण दूर करून आजच्या आज जीआर काढणार का, असा प्रश्‍न काळे यांनी केला.

भाजपचे रणजित पाटील यांनीही अनुदानाबाबत निर्णय घेण्याची मागणी केली. या चर्चेला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अनुदानाचा निर्णय घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. मंगळवारी याविषयी बैठक बोलावण्यात आल्याचे सांगितले. मात्र मागच्या सरकारने अखेरच्या टप्प्यात घेतलेल्या निर्णयांची पडताळणी करून अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावावर सही केली असली तरी वित्त विभागाकडून प्रस्ताव तपासला नव्हता. शिक्षकांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. वित्त विभागाकडून तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. त्यांच्या या वक्‍तव्यावरून वादाला सुरुवात झाली. शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा उघड संघर्ष सुरू झाला. केसरकरांच्या मदतीला धावून जाताना गुलाबराव पाटील यांनी जोरजोराने बोलत हातवारे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपसभापतींनी त्यांना समज दिली.

शाळांच्या अनुदानाचा निर्णय करायचाच होता तर सरकार बहुमतात असताना अंमलबजावणी का केली नाही? सरकार अल्पमतात गेल्यावर, राज्यपालांनी पत्र दिल्यावर निर्णय घेण्यात आले. त्यामुळे अशा निर्णयांचा आढावा तसेच पडताळणी सुरू आहे. शाळा अनुदानाबाबात सरकार सकारात्मक आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT