पुणे; पुढारी वृत्तसेवा: उरुळी देवाची येथील महापालिकेच्या कचरा डेपोच्या परिसरातील कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या छतावर 100 किलो वॅट सौरऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. यासाठी 55 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यातून निर्माण होणारी वीज परिसरातील पथदिवे, वॉटर पंप तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काट्यासाठी वापरण्यात येणार आहे.
उरुळी देवाची येथील कचरा डेपो आणि प्रकल्प बर्याच समस्यांमुळे मागील 25 वर्षांपासून चर्चेत आहे. यासंदर्भात हरित लवादामध्येही याचिका दाखल झाल्या आहेत. एका प्रकरणात लवादाने महापालिकेला दोन कोटी रुपये सॉल्व्हन्सी (जात मुचलका) भरण्याचे आदेश दिले होते. यापुढे जाऊन या रकमेतून कचरा डेपो परिसरात पर्यावरणपूरक कामे करण्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यानुसार महापालिकेने कचर्यापासून निर्माण होणारे लिचेड वाहून नेण्यासाठी गटारे बांधली आहेत. तसेच कचरा डेपोच्या रॅम्पवर तसेच उर्वरित जागेवर वृक्षारोपण केले आहे.
उरलेल्या 50 ते 55 लाख रुपये खर्चातून कचरा डेपोच्या आवारात प्रक्रिया प्रकल्पांसाठी उभारण्यात आलेल्या शेडस्वर सोलर पॅनल बसवून सौरऊर्जा निर्माण केली जाणार आहे. यासाठीच महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली आहे. या प्रकल्पामुळे देवाची उरुळी येथील कचरा डेपोसाठीचा विजेचा खर्च शून्यावर येणार असून, उलट महापालिकेला अतिरिक्त वीज विक्रीतून पैसे मिळतील, असा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.
अतिरिक्त वीज विकण्याचे नियोजन
सध्या याठिकाणचा प्रक्रिया प्रकल्प भूमी ग्रीन या कंपनीकडून चालविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या शेडवर हे सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत. याठिकाणी निर्माण होणारी ऊर्जा नेट मिटरिंगच्या माध्यमातून महापारेषणला देण्यात येणार आहे. कचरा डेपोच्या आवारातील पथदिवे, वजन काटा, तसेच पंप हाउसच्या मोटारी, सीसीटीव्ही यंत्रणा चालविली जाणार आहे. सध्याच्या गरजेपेक्षा अधिक वीज उत्पादन होणार असल्याने अतिरिक्त वीज विकण्याचे नियोजन करण्यात आले आहे.