Latest

बुलढाणा : ‘राजयोग’ कुणाला सहज तर कुणाला संघर्षाने लाभतो; योगेंद्र गोडे यांची गोष्ट आणि बरंच काही..!

अनुराधा कोरवी

बुलढाणा; विजय देशमुख : 'राजयोग' कुणाला सहज लाभतो, कुणाला संघर्षाने, तर कुणाला केवळ खुणावतच राहतो! असं म्हटले जाते. भाजप नेते योगेंद्रे गोडे यांनी विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून दोन वेळा आपला 'राजयोग' चाचपून पाहिला होता. पण त्यांची निराशा झाली होती. आता विधानसभेचा नाद सोडून दुसराच नवा 'राजमार्ग' चोखाळला जाणार असल्याचे जिल्ह्यातील भाजपा वर्तुळात जोकसपणे बोलले जात आहे.

अलिकडेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत असताना तेथे भाजप मंत्री योगेंद्र गोडे, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्तेही गायकवाडांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने धडकले होते. अचानक झालेल्या या एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे दृश्य एका अर्थाने नवलाईचे होते. शिंदे गटाच्या 'उठावा' मुळेच तर भाजपला सत्तेची भागीदारी अकस्मात प्राप्त झाल्याने नेते व कार्यकर्ते कमालीचे उत्साहित होते. आ. गायकवाडांनी पत्रकार परिषदेत गोडे यांना आपल्या अगदी निकट बसवून उचित सन्मान दिला. गायकवाडांचा हा शिष्टाचार सुसंस्कृतपणाचा होता. तद्वतच योगेंद्र गोडे यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांसह उत्स्फूर्तपणे व मोठ्या संख्येने गायकवाडांच्या स्वागतासाठी येऊन राजकीय प्रगल्भता आणि मनाचा मोठेपणा दाखवला होता.

आमदार गायकवाड यांच्या नव्या भुमिकेचे जोरदार स्वागत करा अशा सुचना देवेंद्र फडणवीसांनीच आ. संजय कुटे यांच्यामार्फत भाजप नेत्यांना दिल्या होत्या. अशी माहितीही समोर आली. आ. गायकवाडांच्या बाजूला योगेंद्र गोडे बसलेले पाहून एका पत्रकाराने गायकवाडांना प्रश्न उपस्थित केला. 'भविष्यात लोकसभा निवडणूक लढण्याचा आपला विचार आहे का? यावर गायकवाडांनी " ..पॉलीसीच ठरलेली आहे की, पक्षाचे सिटींग आमदारच त्या- त्या जागा लढवतील, त्यामुळे मी विधानसभा लढवेल, लोकसभेचा प्रश्नच नाही".असे उत्तर तत्परतेने दिले होते.

त्यावेळी बाजूला बसलेले गोडे निरागसपणे गालातल्या गालात हसले होते. यावेळी विधानसभेचा विषय गोडे यांच्या मनातही नसावा. तेथे त्यांची उपस्थिती असा कोणताही हेतू ठेऊन नव्हती. असेही म्हणता येईल. प्रश्नकर्त्या पत्रकाराचा रोख या दिशेने होता की, आता नवी युती झालीच आहे. तर जिल्ह्यात पुढे लोकसभा- विधानसभा निवडणूकीत आपसी वाटाघाटीचं काही नवं सुत्र तयार होईल का? त्यावर गायकवाडांनीच तात्काळ खुलासा करून विषय संपवला.

'राजयोगा'ची चाचपणी

योगेंद्र गोडे हे बुलढाणा विधानसभा निवडणूक २०१४ (भाजप) व २०१९ (अपक्ष) अशी दोन वेळा लढवून पराभूत झाले. भाजपने २०१४ मध्ये बुलढाण्याची उमेदवारी अगोदर अॅड. व्ही. डी. पाटील यांना दिली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अॅड. पाटील हे गर्दे वाचनालयापासून मिरवणुकीने निघण्याच्या तयारीत होते. प्रांगणात ढोल ताशे वाजत होते. एवढ्यात अचानक काही कळ फिरली आणि ऐनवेळी योगेंद्र गोडे यांनी भाजपची उमेदवारी पटकावल्याची वार्ता धडकल्याने अॅड. पाटलांना मोठा धक्का बसला होता. गोडे हे तातडीने दुचाकीवर बसूनच उमेदवारी अर्ज भरायला गेले होते. सगळं कसं चमत्कारिक झालं होतं. एकनाथ खडसे यांना शह देण्यासाठी फडणवीसांनी अॅड. पाटलांचा पतंग काटला होता. पण चौरंगी लढतीत बलदंड उमेदवार शिक्षण सम्राट योगेंद्र गोडे पराभूत झाले. अॅड. पाटलांची उमेदवारी कापल्याचा राग त्यांच्या समाजबांधवांनी दाखवल्याचे बोलले गेले होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजपचे योगेंद्र गोडे हे अपक्ष म्हणून लढले. त्यांना भाजपा प्रायोजित अपक्ष उमेदवार समजले गेले होते. त्यावेळी शिवसेनेचे संजय गायकवाड विजयी झाले. अपक्ष गोडे यावेळीही पराभूत झाले होते. योगेंद्र यांचे वडील डॉ. राजेंद्र गोडे १९९० मध्ये बुलडाण्यात शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर छगन भुजबळांसोबत बंड करून त्यांनी कॉग्रेसची वाट धरून गृह खात्याचे उपमंत्रीपद मिळवले होते. राजबिंडे असलेल्या राजेंद्र गोडे यांनी ते उपमंत्रीपद एखाद्या पॉवरफूल कॅबिनेट मंत्र्यासारखे गाजवले होते.

आता गोडे परिवाराकडे अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी महाविद्यालये, डी. एड. बी. एड. कॉलेजेस, अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये अशी शैक्षणिक सत्ता आहे. त्याच जोडीला 'सुप्रभात डेअरी'ही आहे. योगेंद्र यांना रस्त्यावर उतरून आंदोलने करणे जमले नाही. परंतू, उत्तम संघटक म्हणून ते भाजपा संस्कृतीत रमले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या 'गुडबुक' मध्ये अग्रेसर ही त्यांची जमेची ठेव आहे. योगेंद्र यांचे नाव विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त संभाव्य आमदारांच्या सुचीत असल्याचा भाजपातील विश्वसनीय सुत्रांचा दावा आहे. 'त्या' दिवशी योगेंद्र गोडे किती उत्साहाने वावरत होते. त्यांची इप्सित मनिषा पूर्ण होण्यासाठी शिंदे-भाजपा युती हा त्यांना शुभशकून वाटला असावा!.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT