Latest

बीड : साडेसात हजार रुपये वीज बिल, पण एक गुंठा जमिनीला पाणी मिळेना!

Shambhuraj Pachindre

नेकनूर : मनोज गव्हाणे

प्रति कनेक्शन साडेसात हजार याप्रमाणे सक्तीची वीज वसुली नुकतीच वीज कंपनीने केली असतानाही पिकांना पाणी देण्याच्या वेळेला वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने दिवसभरात एक गुंठा जमिनिला पाणी मिळत नाही. पाणी पाईलाइनच्या बाहेर पडण्यापूर्वीच वीज गुल होत असल्याने नेकनूर परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकायला नेकनूरचे गावातील कार्यालय बंद असल्याने कोणीही भेटायला तयार नाही.

आठवड्यात काही भागासाठी दिवसा तर काही भागासाठी रात्री थ्री फेज आठ तास वीज पुरवठा केला जातो, यामध्ये त्या ट्रांसफार्मरवर असणाऱ्या मोटारी सुरू राहतील, पिकांना पाणी मिळेल या आशेवर शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात थांबत असताना वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नेकनूर परिसरातील अनेक गावचे शेतकरी संतप्त झाले आहेत.

शेतीला पाणी मिळाले नाही तर हरभरा, गहू, ज्वारी, कांदा या पिकांना मोठा फटका बसतो. त्यामुळे आज ना उद्या वीज पुरवठा सुरळीत होईल या आशेवर रात्री थंडीत थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी नित्याने निराशा येत आहे. येळबघाट येथील 33 केव्ही केंद्रातून होणाऱ्या वीज पुरवठयात मोठी गडबड होत असल्याने या केंद्रांतर्गत येणाऱ्या चाकरवाडी परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.

विशेष म्हणजे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यास अडचण येवू नये म्हणून पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी सक्तीच्या वसुलीत साडेसात हजार रुपये जमा केले होते. तरीही त्यांना वीज कंपनी सुरळीत वीजपुरवठा करत नसल्याने परिसरातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सातत्याने पुरवठा सुरळीत होत नसल्याने शिवाय काही तास वीज पुरवठा अखंड होत नसल्याने दुरुस्तीचे कामे फक्त गुत्तेदार पोसण्यासाठी झाली की काय? असा प्रश्न उपस्थित होत असून वीज कंपनीने कारभारात सुधारणा केली नाही तर शेतकऱ्याचा संताप रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी शेतकऱ्यांनी नेकनूरचे प्रभारी कनिष्ठ अभियंता देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता.

मागच्या पाच दिवसांत चार सरी भिजल्या. यामुळे शेतात रात्री थांबून काहीच फायदा होत नाही. आठ तासांत तासभर वीज मिळत नाही. तक्रार घेण्यास कोणी उपलब्ध नाही. बिले मात्र साडेसात हजारांपेक्षा कमी घेतली नाहीत. दोन दिवसांत सुधारणा झाली नाही तर आत्मदहन करू!

संजय शिंदे, माजी सरपंच नेकनूर

महावितरण नेकनूर, येळंबघाटच्या कारभारामुळे चाकरवाडी व परिसरातील शेतकरी हैराण आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाचे पुढारी चाकरवाडी मध्ये प्रचाराचा शुभारंभ करतात. ते आता वीज समस्या संदर्भात गप्प आहेत. वीज कंपनीच्या कारभाराने हातातोंडाशी आलेली रब्बीची पिके हिरावण्याची भीती आहे.

विवेक हजारे ,शेतकरी चाकरवाडी

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT