कडूस, पुढारी वृत्तसेवा: वडगाव पाटोळे (ता.खेड जि.पुणे) येथील गायकवाड वस्ती जवळ बुधवारी (दि.१८) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुभाष निवृत्ती गायकवाड यांच्यावर बिबट्याचा हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
गायकवाड वस्तीजवळ असणाऱ्या कालव्या जवळून गायकवाड सकाळी आपल्या घराकडे चालले होते. त्यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी केले.
वडगाव पाटोळे परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून परिसरात शेतीला पाणी उपलब्ध होत असल्याने उसाबरोबच बागायती क्षेत्र अधिक आहे.
बिबट्याला मोठ्या प्रमाणात लपण जागा मिळाल्याने परिसरात दिवसेंदिवस बिबट्याची दहशत पसरली आहे.
बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याच परिसरात एक महिन्यापुर्वी शेतात काम करणाऱ्या महिलेला तीन बिबटे दिसले होते.
ही घटना ताजी असताना कामावरून घरी जाणाऱ्या दुचाकी स्वारावरही हल्ला केला होता. लहान मुलांना घराबाहेर सोडण्यासाठीही पालक घाबरत आहेत.
शेतात काम करण्यासाठी कोणीही तयार होत नाहीत.
बिबट्याचा हल्ला हाोऊ शकताो त्यामुळे वातील नागरिकांनी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतात काम करताना एकटे जाऊ नये. शेतात काम करताना समुहाने काम करा.
आपल्या घरातील मुलांना एकटे सोडून नका, त्यांची काळजी घ्या, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दोन महिन्यांपासून वडगाव पाटोळे परिसरात बिबट्याने दहशत माजविली असताना तालुका प्रशासन, वनविभाग, शेतकऱ्यांना धीर देण्या बरोबरच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.