वनस्पती पासून बनवली कोरोनावरील लस | पुढारी

वनस्पती पासून बनवली कोरोनावरील लस

लंडन : सध्या जगभर कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध झाल्या असल्या तरीही याबाबत अधिकाधिक नवे संशोधन सुरूच आहे. आता अशी लस अधिक स्वस्त दरात उपलब्ध व्हावी यासाठी संशोधकांनी ‘मॉलिक्यूलर फार्मिंग’ची पद्धत अवलंबली आहे. या तंत्राचा वापर करून वनस्पती पासून ‘कोव्हिड व्हॅक्सिन’ बनवण्यात आली आहे. तिला ‘कोव्हीएलपी’ असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय अशा पद्धतीने एक फ्लू व्हॅक्सिनही विकसित करण्यात आली आहे.

वैज्ञानिकांचा दावा आहे की या तंत्राने तयार केलेल्या लसीची किंमत अतिशय कमी असेल. तसेच ती वेगवेगळ्या लोकांच्या गरजेप्रमाणे दिली जाऊ शकेल. प्रसिद्ध ब्रिटिश फार्मा कंपनी ग्लॅक्सो स्मिथक्लाईन आणि बायोटेक कंपनी ‘मेडिकागो’ने मिळून ही लस विकसित केली आहे. या तंत्रामध्ये आधी प्रयोगशाळेत विषाणूची जनुकीय सामग्री बनवली जाते.

त्यानंतर ती एका वनस्पती मध्ये सोडली जाते. अशाप्रकारे विषाणूची जनुकीय सामग्री (जेनेटिक मटेरियल) इंजेक्ट करून संपूर्ण वनस्पतीमध्ये पोहोचवली जाते. हे रोप मोठे झाल्यावर त्याची पाने तोडून त्यामधून अर्क बाहेर काढला जातो.

हा अर्क फिल्टर केल्यावर त्यापासून लस विकसित केली जाते. ‘कोव्हीएलपी’ एक व्हायरस-लाईक-पार्टिकल व्हॅक्सिन आहे. याचा अर्थ ती अशा पार्टिकलपासून बनवली आहे जो अगदी खर्‍या विषाणूसारखाच असतो, मात्र त्याचे संक्रमण किंवा बाधा होत नाही.

त्याच्यामुळे शरीरात त्याविरुद्ध मोठ्या संख्येने अँटिबॉडी विकसित होऊ लागतात. जर खरा कोरोना विषाणू शरीरात संक्रमित झाला तर या आधीच तयार झालेल्या अँटिबॉडी त्याला नष्ट करून टाकतात. संशोधकांनी अशी जनुकीय सामग्री ‘निकोटियाना बेंथामियाना’ नावाच्या वनस्पतीमध्ये सोडली होती व त्यापासून ही लस तयार केली.

Back to top button