Latest

प्रबोधनाने त्यांनी सोडली गुन्हेगारी; पोलिसांना भाऊ मानून बांधली राखी

अमृता चौगुले

पाचोड, मुक्तार शेख : फासे पारधी समाजातील व्यक्तींच्या माथ्यावर आधी पासूनच गुन्हेगारीचा शिक्का बसलेला आहे. त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कायमची पुसली जावी यासाठी त्यांचे मत परिवर्तन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सतत जनजागृती करण्यात येते. बहीण भावाच्या नात्‍याचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधन सणाच्या दिवशी गुरुवारी (दि.११) पोलिसांना भाऊराया मानत या समाजातील महिलांनी पोलिसांना राखी बांधली. हा बदल केवळ पोलिसांनी केलेल्या प्रबोधनामुळे झाला आहे. पारधी समाजातील या महिला आज सर्वसामान्यासारखे जीवन जगत असल्याचे सांगण्यात आले. राखी बांधून  रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या निमित्ताने भावनिक व आत्मिक समाधान देणारे व जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचा हा प्रसंग पाहून सर्वांचे चेहरे भावूक झालेले पाचोड (ता. पैठण) पोलीस ठाण्यात पाहायला मिळाले.

रक्षाबंधन सण सर्वत्र साजरा होत असताना दुपारी पाचोड (ता. पैठण) येथील पोलीस ठाण्यात परिसरातील वडाजी येथील वीस ते पंचवीस महिला ह्या मुलाबाळांसह दाखल झाल्या. कुठल्या तरी वस्तीवरील त्या असाव्यात, त्यांची काही तरी तक्रार असेल असे वाटत होते. परंतु त्या स्वागत कक्षाजवळ न थांबता थेट सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न  करत होत्या. परंतु  कर्मचाऱ्यांनी  या महिलांना ओळखले. काही महिला कर्मचारी त्यांच्या दिशेने धावल्या. परंतु इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना अडविले.

आता आम्ही गुन्हेगार नाहीत. आम्ही सर्व सोडून दिले आहे. मेहनत करून जीवन जगतो. आमचे पती गुन्हेगार असतील, तर त्यांना शिक्षा द्या. परंतु मागील अनेक महिन्यांपासून आम्ही बदललो आहोत. आमची एकच विनंती आहे, की ज्या पोलिसांनी आमचे प्रबोधन करून आम्हाला बदलले, अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधायची आहे. हे ऐकून काहीवेळ सगळेच थक्क झाले. परंतु खात्री केली असता या महिला पूर्वी गुन्हेगार होत्या. परंतु मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर कसलीच कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी कसलाही गर्व न बाळगता आलेल्या महिलांकडून राखी बांधून घेतली. यापुढे गुन्हेगारी करू नका, अन्याय झाल्यास आमच्याकडे आम्ही संरक्षण देऊ, अशी आश्वासन देत रक्षाबंधनाची एकप्रकारे ओवाळणीच दिली. छोट्याशा परंतु बदललेल्या कार्यक्रमामुळे वातावरण कौटुंबिक झाले होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे, उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलीस कर्मचारी  प्रशांत नांदवे, पवन चव्हाण, फेरोज बर्डे, संतोष चव्हाण, रविंद्र आंबेकर यांच्यासह पारधी समाजातील महिला कट्टा बाई भोसले, अंताबाई भोसले, सोनी भोसले, नर्मदा चव्हाण, शोभा भोसले व इतर उपस्थित होत्या.

गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठीचा प्रयत्‍न

पारधी समाजातील व्यक्तींना आजही गुन्हेगारी कृत्य करण्याचा संशयातून पाहिले जाते. हाच संशय कमी व्हावा म्हणून पारधी समाजातील व्यक्तीची वेळोवेळी भेट घेऊन त्यांचा प्रबोधन करुन त्यांच्या कपाळावर लागलेला गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी या कुटुंबाने एक पाऊल पुढे टाकले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT