उत्तर प्रदेशातील बांदा येथे बोट उलटून 30 जण बुडाले; चौघांचे मृतदेह सापडले | पुढारी

उत्तर प्रदेशातील बांदा येथे बोट उलटून 30 जण बुडाले; चौघांचे मृतदेह सापडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमधील बांदा येथे गुरुवारी दुपारी बोटीचा मोठा अपघात झाला. मार्का पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी एक बोट बुडाली. बोटीत 30 हून अधिक लोक होते. यातील चार जण कसेतरी पोहत नदी काठी पोहचले. पोलीस प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. एसडीआरएफचेही पथक बुडालेल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान बुडालेल्या चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. रक्षाबंधनानिमित्त बोटीवर मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अपघाताची दखल घेतली आहे. योगी यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे.

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मार्का येथून एक बोट काहुनहर घाट फतेहपूरकडे रवाना झाली. या दुर्घटनेबाबत गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या दुर्घटनाग्रस्त बोटीत सुमारे ३० लोक होते. नदीला वेगवान प्रवाह असल्याने बोट पाण्यात बुडाली. काही जण पोहत नदीतून बाहेर आले, तर अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Back to top button