पुणे ; पुढारी वृत्तसेवा : 'व्हाय आर यू हीअर – बीकॉज आय डीड नॉट टेक मेडिसिन, व्हेअर आर यु फ्रॉम – आय अॅम फ्रॉम बाँबे' हे अस्खलित इंग्रजी संवाद वाचून वाटेल की दोन इंग्रजी बोलणा-यांमध्ये संवाद सूरू आहे. मात्र, हा संवाद आहे एक उच्चशिक्षित आणि अस्खलित इंग्रजी बोलणारी मनोरुग्ण महिला आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यातील. आश्चर्य वाटले ना… पण, हे खरे आहे. त्यांचा हा संवाद पाहून उपस्थितांनी तोंडात बोटे घातली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी (दि. 19) येरवडयातील प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांशी संवाद साधला. त्यावेळी, या रुग्णालयात उच्चशिक्षित महिला व पुरूष देखील होते.
मात्र, कौटूंबिक ताण – तणाव, परिस्थिती किंवा वैद्यकीय कारणांमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्यांना त्यांच्या घरच्यांनी येथे दाखल केले. येथे त्यांच्यावर योग्य ते उपचार होत असून ते त्यातून बरे होत आहेत.
आरोग्यमंत्री मनोरुग्णालयातील महिला मनोरुग्णालयाच्या वार्डात गेले असता तेथे काही महिला सुदर हस्तकला बनवत होत्या. त्यामध्ये एक (44 वर्षीय) महिला होती.
ती बीकॉम आणि व्यवसायाने शेफ. ती मुळची मुंबईची पण, आईचे 2016 मध्ये निधन झालेले आणि घरी भाउ व्यसनी झालेला.
त्यानंतर तिचे मानसिक संतुलन बिघडले आणि ती अचानक हिंस्त्र बनू लागली. त्यामुळे तिला तीन महिन्यांपूर्वी नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे वास्तव तिने आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या उत्तरातून समोर आले.
आरोग्यमंत्र्यांनी तिच्यासोबत तब्बल सात ते आठ मिनिटे पूर्णपणे इंग्रजीमध्ये संवाद साधला. अविवाहित असल्याने तिने तिची माहिती शादी डॉट कॉमवरही टाकलेली आहे. एकुणच आरोग्य मंत्र्यांशी या महिलेचा संवाद पाहून सर्व लाेक अवाक झाले.
यानंतर आरोग्यमंत्र्यांनी तिला जे काही मिळाले आहे, त्याबाबत समाधानी राहण्याचा सल्लाही दिला.
ती महिला इतकी अस्खलितपणे इंग्रजी बोलत होती की ती मनोरुग्ण असेल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.
यानंतर तिने आरोग्यमंत्र्यांना तिने तयार केलेल्या हस्तकलेची भेटस्वरूपात वस्तू दिली.
ही महिला मुंबईची असून, तीन महिन्यांपूर्वी दाखल झाली तेव्हा ती फार हिंसक होती. मात्र, योग्य त्या औषधोपचारामुळे तिच्यावर उपचार सूरू झाले असून ती आता बरी झाली आहे. तिला आता घरी सोडण्यात येणार आहे.
– डॉ. अभिजित फडणीस, वैद्यकिय अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे