पारगाव; पुढारी वृत्तसेवा : एकाच घरात चारवेळा बिबट्या शिरला : वळती (ता.आंबेगाव जि.पुणे) येथील तागडे वस्तीत शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री घरात घुसून बिबट्याने चार शेळ्या व दोन बोकडांना ठार केले होते.
बिबट्या पुन्हा त्याच घरात दिवसभरात चार वेळा घुसला होता. रात्री दहा वाजेपर्यंत बिबट्या घरावरच ठाण मांडून बसला होता. त्यामुळे तागडे वस्तीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वनखात्याने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी, नागरिकांनी केली आहे.
तागडे वस्तीतील लहु बाबुराव लोखंडे यांच्या घराशेजारील जुन्या घरात बिबट्याने शिरुन त्यांच्या चार शेळ्या व दोन बोकडांना जागीच ठार केले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी बारा वाजता पुन्हा बिबट्या घरात शिरला. यावेळी लहु बाबुराव लोखंडे हे एकटेच असल्याने त्यांनी फटाके फोडून आरडाओरडा केला.
यावेळी तागडे वस्तीतील शेतकरी जमा झाले .यावेळी बिबट्या घरांवरील कौलांवर जाऊन बसला होता .सर्वांनी बिबट्याला पाहिले.
यावेळी शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर शेजारील मक्याच्या शेतामध्ये बिबट्या उडी मारून गेला.
त्यानंतर पुन्हा चार वाजता बिबट्या घरात शिरला. परंतु नागरिकांनी आरडाओरडा केल्याने पुन्हा उसाच्या शेतात लपून बसला.
सायंकाळच्या वेळी लहू लोखंडे, नारायण लोखंडे, तानाजी लोखंडे, निलेश लोखंडे यांनी मारलेल्या शेळ्यांचे अवशेष दूरवर नेऊन त्याची विल्हेवाट लावली.
ते पुन्हा घरी आले तर बिबट्या घरावर कौलांवर बसून होता.
यामुळे त्यांनी फटाके फोडून त्याला पळून लावण्याचा प्रयत्न केला. वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बाबाजी लोखंडे यांनी केले आहे.
वन खात्याकडे पिंजरे शिल्लक नाहीत. नवीन पिंजरे खरेदी करुन तागडे वस्तीत लवकरात लवकर पिंजरा लावण्यात येईल असे वनक्षेत्रपाल स्मिता राजहंस यांनी सांगितले.
हे ही वाचलं का?