Latest

पालघर : कोपरगावमध्ये मुक्त संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

स्वालिया न. शिकलगार

खानिवडे (जि. पालघर) : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठ दिवसांपासून जीव मुठीत धरून वावरणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील कोपरगावातील रहिवाशांची बुधवारची सकाळ सुखद ठरली. जंगलात व रात्री गावात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात मांडवी (ता.वसई) वनविभागाला यश आले. बिबट्या लावलेल्या सापळ्यात अडकला. वन विभागाच्या मांडवी वनपरिक्षेत्र व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवून बिबट्याला जेरबंद केले.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या ठशांवरून त्याच्या संचाराचा अंदाज बांधला. ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे व पिंजरे लावले होते. त्यांनी केलेल्या जेरबंदीच्या कामगिरीमुळे कोपरवासीयांनी आभार मानले. गेले अनेक दिवस बिबट्याच्या मुक्त संचाराने गाव तणावातच होता. बिबट्या जेरबंद झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बिबट्या कॅमेऱ्यात वारंवार कैद झाल्याने वनविभागाकडून मोहीम अधिकच युद्धपातळीवर आखली होती.

जेव्हा बिबट्या रात्री संचार करताना कॅमेरात कैद झाला, तेव्हा त्याचा पुढील डावा पाय जखमी झाल्याचे दिसून आले. वनखात्याने दिलेल्या माहितीनुसार, नर जातीचा हा बिबट्या अंदाजे चार वर्षांचा आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

SCROLL FOR NEXT