Latest

निपाणी : खुराक पाजताना श्वास कोंडला; सौंदलग्यात ऐन बेंदरा दिवशीच बैलाचा मृत्यू

स्वालिया न. शिकलगार

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : बुधवारी ऐन बेंदूर सणादिवशीच सौंदलगा येथे बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. बेंदूर सणाच्या निमित्ताने बैलाला खुराक पाजवताना श्वास कोंडला गेल्याने ही घटना घडली. या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यावर आभाळ कोसळले तर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सायंकाळनंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबतची अधिक माहिती अशी की, सौंदलगा गावच्या पश्चिमेकडील बाजूस असलेल्या वसाहतीमधील सुनील शामराव परमकर या युवा शेतकऱ्याने बैलजोडी पाळली आहे. दरम्यान, बुधवारी बेंदूर सणाच्या निमित्ताने सुनील याने सकाळी बैलजोडीला नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालून दुपारी दोन बैलाची रंगरंगोटी केली. यावेळी सहकारी शेतकऱ्यांच्या मदतीने सणाच्या निमित्ताने `मोत्या` या बैलाला खुराक पाजत असताना अचानकपणे श्वास कोंडला. त्यामुळे `मोत्या` हा बैल जागेवरच कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच परमकर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. ऐन सणादिवशी हा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, सायंकाळी बैलावर शेतकऱ्यांच्या उपस्थित अंत्यविधी करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सायंकाळनंतर परिसरात व्हायरल झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी परमकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. विशेष म्हणजे परमकर यांचा पिढीजात शेती व्यवसाय आहे. शेती व्यवसायासाठी त्यांनी बैल जोडी अनेक वर्षांपासून पाळली आहे. दरम्यान बैलपोळा बेंदूर सणादिवशीच त्यांनी पाळलेल्या बैलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परमकर कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.

हेदेखील वाचा-

SCROLL FOR NEXT