जप्‍त साहित्य परत घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र सक्‍तीचे | पुढारी

जप्‍त साहित्य परत घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र सक्‍तीचे

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमण विरोधी पथकाने जप्‍त केलेले साहित्य परत पाहिजे असेल तर विक्रेत्यांना दंडाबरोबरच पुन्हा त्याठिकाणी अतिक्रमण न करण्याबाबत प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. असे करुनही पुन्हा चुकीची पुनरावृत्ती केल्यास साहित्य परत दिले जाणार नाहीच शिवाय फौजदारी कारवाईही करण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केलेल्या चार चाकी गाड्या व इतर साहित्य महापालिकेत पडून आहेत. काही दिवसांपूर्वी सात रस्ता , एस.टी. स्टँड व रेल्वे स्टेशन आदी भागांत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईमध्ये एकूण 30 चार चाकी गाड्या व 8 मोठे काउंटर जप्त करण्यात आले होते.

दरम्यान, ही कारवाई झाल्यानंतर साहित्य परत नेण्यासाठी विक्रेते अतिक्रमण प्रतिबंधक पथक कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. याबाबत आयुक्तांना विचारले असता त्यांनी नवी नियमावली स्पष्ट केली. त्यानुसार प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक असून, पुन्हा तीच चूक केल्यास साहित्य परत न देता फौजदारी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

असे आहेत दंडाचे दर

नव्या दरानुसार चार चाकी गाडी 4 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर लोखंडी टेबल-खुर्ची बाकडे इतर सामान यासाठी एक हजार रुपये दंड आहे. लाकडी टेबल तीनशे रुपये प्रतिनग याप्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड मोठ्या प्रमाणात आहे फेरीवाल्यांकडे तो दंड भरण्याची क्षमता नाही. यामुळे दंड कमी व्हावा, अशी मागणी हे विक्रेते पालिका प्रशासनाकडे करीत आहेत.

Back to top button