Latest

नाशिक : गुलाबजामच्या डब्याने केली वळूची फजिती, नागरिकांची पळता भुई

गणेश सोनवणे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
दोन वळू एकमेकांना भिडल्याने मुख्य मार्ग अथवा बाजारपेठेत नागरिकांची पळता भुई होण्याचे प्रकार नेहमीच कुठे ना कुठ घडत असतात. परंतु, एखादे भांडे डोक्यात अडकून मर्कट, श्वानाप्रमाणे फटफजिती होण्याचा प्रसंग वळूवर ओढवतो, तेव्हा त्याच्या मदतीसाठी धजावणार्‍यांना चांगलीच कसरत करावी लागते. अशीच घटना शहरातील वर्धमाननगरमध्ये घडली. हे मदतकार्य सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

शहरात मोकाट जनावरांची कमी नाही. ते कधी रस्ते अडवून ठाण मांडतात, तर कधी एकमेकांना भिडून शक्तिप्रदर्शनात बाजारपेठेतील दुकानदार, वाहनचालकांना नुकसानीचे धनी करतात. परंतु, शनिवारी (दि. 11) वर्धमाननगर भागात डौलात फिरणार्‍या वळूचा जीव टांगणीला लागला होता, तो एका डब्यामुळे. अन्न म्हणून जे मिळेल, ते चाखण्याच्या सवयीने एका वळूने गुलाबजामचा रिकामा डबा चाखायचा प्रयत्न केला अन् तो डबाच तोंडात अडकला. काही केल्या तो निघाला नाही. त्याच अवस्थेत या वळूची भ्रमंती पाहून काही प्राणिप्रेमी नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावले. या वळूला शांत कसे करायचे म्हणजे मदतकार्य सोपे होईल, हा प्रश्न होताच. अखेर दोरखंडांनी वळूवर फासे टाकण्यात आले. ते करताना चांगलीच कसरत करावी लागली. त्यात यश येऊन वळूला एका भिंतीलगतच्या झाडाजवळ अडकविण्यात आले. शिताफीने डबा काढण्यात आला. परंतु, पत्र्यामुळे वळूच्या तोंडाला जखम झाली होती. औषधोपचार, इंजेक्शन देण्यात आले.

या मदतीने हायसे वाटलेल्या वळूने शांतता बाळगली. मुका जीव असला, तरी त्यालाही भावना असतात आणि मदतीची भाषा त्यांनाही कळते, याचा अनुभव यावेळी अनेकांनी घेतला. जखमेची स्वच्छता व मलमपट्टी झाल्यानंतर वळूचे दोरखंड खुले करण्यात आले अन् वळूने मोकळा श्वास घेतला.

मोकाट वळूंची दहशत
चार वर्षांपूर्वी रामसेतूजवळील श्रीराम मंदिरालगत एकमेकांना भिडलेले दोन वळू आडात पडले होते. मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी 17 तासांच्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने या वळूंना बाहेर काढण्यात यश मिळविले होते. बलदंड शरीराचे असे अनेक वळू शहरात भटकत असतात. एका वळूने पादचार्‍याला शिंगावर घेत भिरकावले होते. धोकादायक ठरणार्‍या या वळूंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT