Latest

नांदेड : भारत जोडो यात्रेला जन यात्रेचे स्वरूप

निलेश पोतदार

नसीफाटा ; पुढारी वृत्‍तसेवा : शंकरनगर येथून पहाटे निघालेल्या भारत जोडो यात्रेला जन यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. किनाळा, हिप्परगा माळ मार्गे राहुल गांधी यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा जत्था आज (मंगळवार) सकाळी साडेसात वाजता नरसी चौकात धडकला. यावेळी उस्फूर्तपणे घोषणाबाजी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. तर "नफरत फैलाना छोडो… भारत देश को जोडो" या जयघोषाने शहर दुमदुमले. भारत जोडो यात्रेत युवा, वयोवृद्ध, लहान मुलांचा लक्षणीय समावेश होता.

नरसी चौकात भारत जोडो यात्रा ही लक्षवेधी ठरली, तर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चौकात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी आणि देशाचे दिवंगत माजी गृहमंत्री कै शंकरराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी स्टजेची उभारणी करण्यात आली होती. चौकात यात्रेचे आगमन होताच राहुल गांधी यांनी दोन्ही महापुरुषांना अभिवादन करत, त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
२० मे १९९१ रोजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची नरसी येथे सभा होती. त्या सभेला संबोधित केलेल्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे २१ मे १९९१ रोजी त्यांची हत्या झाली होती. राहुल गांधी या मार्गावर मार्गस्थ असल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या कार्याला उजाळा मिळवा या हेतूने ही अभिवादन सभा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी आयोजित केली होती.

नरसी शहराची हद्द सुरू झाल्यानंतर सर्वत्र राहुल गांधी यांचे स्वागत करणारे बॅनरच बॅनर झळकत होते. तर चोहीकडे लावण्यात आलेल्‍या काँग्रेस पक्षाचे झेंड्यांनी नायगांव शहरापर्यंत काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले होते. नरसी चौकात आलेल्या या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या समवेत कन्हैया कुमार, नाना पटोले यांच्यासह काँग्रेस मधील दिग्गज नेते उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT