Latest

नवे ‘भाई’ परप्रांतीय टोळीत; राजस्थान, हरियाणा, पंजाबमधील गँगस्टरचे तरुणांना आकर्षण

अमृता चौगुले

अशोक मोराळे

पुणे : एके काळी मुंबईतील गँगस्टरची देशात मोठी दहशत होती. येथील गुन्हेगारी टोळ्यांनी दिल्ली, नेपाळपासून थेट दुबईपर्यंत आपले वर्चस्व निर्माण केले होते. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे. पुण्यातील उदयोन्मुख भाई परप्रांतीय गँगस्टरच्या स्टाईलला भुलून त्यांच्या वाटेवर चालू पाहात असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रामुख्याने राजस्थान, हरियाणा आणि पंजाब राज्यातील गँगस्टरला हे तरुण फॉलो करू पाहत आहेत.

पंजाबी गायक मुसेवाला हत्या प्रकरणात परप्रांतीय टोळीची लिंक पुण्याशी जोडली गेल्याने हा विषय चर्चेत आला आहे. पंजाबचे प्रसिद्ध गायक व काँग्रेस पक्षाचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणामध्ये पुणे जिल्ह्यातील संतोष जाधव (वय 24, रा. पोखरी, आंबेगाव), सौरभ महांकाळ ऊर्फ सिद्धेश कांबळे (रा. मढ, पारगाव, जुन्नर) हे दोघे संशयित आहेत. दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

2021 पासून हे दोघे ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याच्या खून प्रकरणातील मोक्कात फरार होते. या कालावधीत त्यांनी इतर काही साथीदारांसोबत राजस्थान, पंजाब आणि हरियाणा येथे वास्तव केले आहे. जाधव याच्यावर राजस्थानमधील जोधपूर येथे गुन्हा दाखल आहे. हे दोघे कुविख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत. तसे पोलिसांच्या तपासात समोरदेखील आले आहे. दोघे मूळचे पुणे जिल्ह्यातील आहेत. मात्र स्थानिक सराईत गुन्हेगारांची परराज्यातील गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याची ही अपवादात्मक घटना असल्याची चर्चा आहे.

असे असले तरी अनेक तरुण परराज्यातील गुन्हेगारी टोळ्यांकडे आकर्षित होत असल्याचे वास्तव आहे. पुण्यातील इतरही काही तरुण बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. लॉरेन्सच्या टोळीत एक – दोन नव्हे तर सातशेपेक्षा अधिक साथीदार आहेत. टोळीचे काम दोन विभागांत चालते. भारताचा उत्तरेकडील भाग हा गोल्डी पाहतो, तर दक्षिणेकडील भाग हा विक्रमजित पाहतो. अभिनेता सलमान खान याला पाठविण्यात आलेले धमकीचे पत्र या दोघांनीच पाठविले आहे. गोल्डी आणि विक्रमजीत हे दोघे कॅनडात बसून बिश्नोई टोळीचे काम पाहतात.

असे होते टोळीत इनकमिंग

एखादा गुन्हा केल्यानंतर आरोपीला अटक करून त्याची रवानगी कारागृहात केली जाते. तेथे ते अनेक सराईत गुन्हेगार, टोळीप्रमुखाच्या संपर्कात येतात. त्यातील कित्येक जणांकडे वकिलांचा व जामिनाचा खर्च करण्यासाठी पैसा नसतो. अशा वेळी या टोळीप्रमुखांकडून त्यांना सर्व मदत केली जाते. एखाद्या गुन्ह्यात फरार झाल्यानंतर टोळीतील बाहेरच्या राज्यातील साथीदारांकडून त्यांना लपण्याची सोय केली जाते. आर्थिक रसद पुरविली जाते. एवढेच नाही तर तक्रारदाराला हे गँगस्टर धमकावतात. भाईच्या एक फोनमुळे आपल्याला जामीन मिळाला, अशी या उदयोन्मुख गुन्हेगारांची धारणा होते. त्यानंतर ते भाई सांगतील ते काम करण्यास सुरुवात करतात. विशेष म्हणजे गँगस्टर कारागृहात बंद असताना हे सर्व घडते. त्यामुळे इतर तरुणदेखील टोळीत आकर्षित होतात.

सोशल मीडियाचा गँगस्टरकडून प्रभावी वापर

पंजाब, राजस्थान आणि हरियाना, दिल्ली येथील टोळ्यांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जातो. एखाद्या व्यक्तीला धमकी देणे असो की एखाद्याचा गेम सेट केल्यानंतर त्याची जबाबदारी घेणे असो, अशा वेळी थेट सोशल मीडियावर त्याची गँगस्टरकडून माहिती टाकली जाते. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात संबंधित गँगस्टर व त्याच्या टोळीचा दबदबा वाढतो तसेच त्याचा भावदेखील चढतो. एवढेच नाही तर या गुन्हेगारांकडून व्हिडिओदेखील त्यांच्या पेजवर प्रसिद्ध केले जातात. येथील राज्यातील गँगस्टरना लाखोंमध्ये फॅन फॉलोव्हर आहेत.

त्यांच्या याच आकर्षणाला भुलून ओठावर मिसरूड न फुटलेली पोरं त्यांच्या संपर्कात येतात. मग सुरू होतो प्रवास त्यांच्यासारखे तयार होण्याचा, त्यासाठी ही तरुण पोरं राहण्याच्या पेहरावापासून ते बोलण्याच्या लकबेपर्यंत गँगस्टरला फॉलो करत, इन्स्टाग्रामवर हातात पिस्तूल घेतलेले व्हिडीओ अपलोड करणे, गँगस्टरचे फोटो टाकून धमकी देणे, असे कृत्य त्यांच्याकडून केले जाते. गँगस्टरना आपल्या टोळीत काम करण्यासाठी अशा तरुणांची गरज असतेच. आर्थिक प्रलोभन, आपण कसे आहेत, त्याच्यासाठी मसिहा आहोत असे दाखवून ते हवे ते काम या तरुणांकडून करून घेतात.

असे आले लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात

लॉरेन्स हा सध्या दिल्लीच्या तिहार कारागृहातील विशेष सेलमध्ये बंद आहे, तर त्याचे दोन साथीदार विक्रमजितसिंग बरार व गोल्डी बरार हे कॅनडात वास्तव्यास आहेत. महांकाळ हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रमजितच्या संपर्कात होता, तर जाधव हा पूर्वीपासूनच गोल्डी व विक्रमजितच्या संपर्कात होता. विक्रमजित व गोल्डी हे लॉरेन्सच्या टोळीतील महत्त्वाचे साथीदार आहेत. मुसेवालाची हत्या करण्यासाठी रेकी करण्यापासून ते अत्याधुनिक हत्यारे पुरविण्याचे काम गोल्डी आणि विक्रमजित या दोघांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

पालकांनो, सावध व्हा..!

इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इतर सामाजिक माध्यमातून तरुण एकमेकांना फॉलो करतात. ते त्यांचे फॅनदेखील असतात. कित्येकजण त्यांना आपला आदर्श ठेवून त्याच्यासारखे काम करण्याचा प्रयत्न करतात. आदर्श चांगला असेल तर ठीक आहे, मात्र एखाद्या गँगस्टरला आपला आदर्श ठेवून हे तरुण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करत असतील, तर नक्कीच गंभीर आहे. त्यामुळे पालकांनीदेखील आपला मुलगा वापरत असलेल्या मोबाईलमध्ये डोकावून पाहण्याची गरज आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT