Latest

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ : १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन 

backup backup

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वादाला आता नव्या वळणावर आला आहे. जोपर्यंत विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही. असा इशारा आज जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला.

१५ ऑगस्ट ही डेडलाईन आहे, या तारखेपर्यंत राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर दिबा साहेबांच्या जन्मभूमीत प्रज्वलित करण्यात आलेल्या या मशालीचे रूपांतर १६ ऑगस्टपासून क्रांतीच्या वणव्यामध्ये करण्याचा निर्धार यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ०९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा झाला. नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी संघर्ष केला. त्यांचा त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची मागणी आहे.

सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

मात्र ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात जासई येथून मशाल प्रज्वलित करून नेण्यात आली. तत्पूर्वी या ठिकाणी सर्व उपस्थितांनी महापुरुष, हुतात्म्यांना तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांना वंदन करून या मोर्चाला सुरुवात केली.

 मानवी साखळी, सिडको घेरावने सरकारची उडाली भंबेरी

प्रकल्पग्रस्तांच्या एकतेची ताकद प्रचंड आहे, आणि ती सरकारला कळली सुद्धा आहे, मात्र नामकरणाचा एककलमी कार्यक्रम हाती घेऊन त्याचा घाट घालण्याचा प्रयत्न करताना त्याची जाणीव झाली नव्हती. १० जून भव्य मानवी साखळी आणि २४ जूनच्या सिडको घेराव आंदोलनातून सरकारची भंबेरी उडाली आहे. मात्र झोपेचे सोंग घेत राज्य सरकार कारभार करत प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. मात्र खूप झाला अन्याय आता स्वस्थ बसायचं नाही, तर दिबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय माघार घायची नाही, असा गर्भित इशारा या प्रज्वलित मशालीच्या माध्यमातून देण्यात आला. त्यानुसार विमानतळाचे काम बंद करण्यासाठी सोमवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ०९ वाजता ओवळे फाटा येथे जमणार भूमिपुत्र जमणार आहेत.

रामशेठ ठाकूर काय म्हणाले?

दिबासाहेबांचे नाव लागल्याशिवाय ही ज्योत थांबणार नाही. या मशाल मोर्चातून चेतावणी दिली आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने झाली, मात्र आता तसे होणार नाही १५ ऑगस्ट डेडलाईन दिली आहे. तो पर्यंत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही तर जे काही होईल ते होऊ द्या दुसरी क्रांती झाली तरी चालेल १६ ऑगस्ट पासून विमानतळाचे सर्व काम बंद पाडू. लोकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळाला नाव आणि प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न निकाली लागेपर्यंत संघर्ष करत राहणार.

– लोकनेते रामशेठ ठाकूर

आमदार प्रशांत ठाकूर काय म्हणाले?

आपल्या सर्वांना दिबासाहेबांचा वारसा पुढे चालवायचा आहे. ही संघर्षाची, त्यागाची भूमी आहे. १६ जानेवारी १९८४ ला ऐतिहासिक लढा दिबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. आता १६ ऑगस्टला क्रांतीला पुन्हा सुरुवात होणार आहे. मशाल पेटली आहे राज्य सरकारने आता तरी जागे व्हावे कारण मागील दोन्ही आंदोलनापेक्षा आता होणारे आंदोलन मोठे असणार आहे.  दिबासाहेबांचे नाव विमानतळाला मिळेल त्या दिवशी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याची सुरुवात होईल. त्यामुळे आंदोलन कितीही वर्षे चालू द्या नाव मिळेपर्यंत संघर्षाचा लढा सुरूच राहील.

– आमदार प्रशांत ठाकूर

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : त्वचा नितळ होण्यासाठीच्या पाच टिप्स

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT