Latest

देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७१ टक्क्यांवर

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील कोरोना महारोगराईची लाट आता ओसरली आहे. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर उच्चांकी ९८.७१ टक्के नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे शुक्रवारी दिवसभरात केवळ ३ हजार ६१४ कोरोनाबाधित आढळले. तर, ५ हजार १८५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दुदैवाने ८९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. शनिवारी देशाचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.४४ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.५२ टक्के नोंदवण्यात आला.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी २९ लाख ८७ हजार ८७५ पर्यंत पोहचली असली, तरी यातील ४ कोटी २४ लाख ३१ हजार ५१३ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ४० हजार ५५९ सक्रिय रुग्णांवर (०.०९ टक्के) उपचार सुरू आहे. दुदैवाने आतापर्यंत ५ कोटी १५ लाख ८०२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७९ कोटी ९१ लाख ५७ हजार ४८६ डोस लावण्यात आले आहेत. यातील १८.१८ लाख डोस शुक्रवारी दिवसभरात देण्यात आले. खबरदारी म्हणून आतापर्यंत २.११ कोटी बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांहून अधिक वयोगटातील वृद्धांना देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८२ कोटी ४३ लाख ६६ हजार ५२० डोस पैकी १७ कोटी १५ लाख २३ हजार ५९१ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत ७७ कोटी ७७ लाख ५८ हजार ४१४ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात ८ लाख २१ हजार १२२ कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT