Latest

देशभरातील १५२ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा विशेष पदकाने गौरव

निलेश पोतदार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या १५२ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील ११ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने २०१८ साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले.

ही पारितोषिके मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण १५ जणांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील ११, गोवा पोलिस दलातील १ आणि गुजरातच्या पोलीस दलातील ६ अधिकाऱ्यांनी हे पदक मिळविले आहे.

तसेच या मानकऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशातील १०, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी ९, तामिळनाडू पोलीस दलातील ८ आणि बिहारचे ७,

कर्नाटक आणि दिल्ली पोलिसांतील प्रत्येकी ६ आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

यामध्ये २८ महिला पोलीस अधिकारी देखील समाविष्ट असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके…

उत्कृष्ट तपास कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस दलातील ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके जाहीर करण्यात आली आहेत.

यादीत पोलीस निरीक्षक ममता लॉरेन्स डिसूझा, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा अमोल बढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका धीरज जाधव,

सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती प्रकाश तिपारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल ढालसिंग बाहुरे, पोलीस निरीक्षक मनोहर नारसप्पा पाटील, पोलीस उपअधिक्षक बाबुराव भाउसो महामुनी,

पोलीस उपअधिक्षक अजित राजाराम टिके, पोलीस निरीक्षक सुनील शंकर शिंदे, पोलीस अधीक्षक सुनील देविदास कडसाने तसेच पोलीस उपअधिक्षक उमेश शंकर माने-पाटील यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT