Latest

टोकियो ऑलिम्पिक : स्पर्धेतील सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडू कोण?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. यात जगातील २०६ देशांमधील ११,२३८ खेळाडू सहभागी होत आहेत.

किशोरवयीन मुलांपासून ते वयाची साठी ओलांडलेले खेळाडू या जागतिक क्रीडा मेळाव्यात सहभागी झाल्याचे दिसत आहे. चला तर जाणून घेउया टोकियो ऑलिम्पिकमधील सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अ‍ॅथलीट कोण आहेत.

सर्वात वयस्कर ऑलिम्पिकपटू…

ऑस्ट्रेलियातील आजीबाई मेरी हाना सहाव्यादा ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेत आहे. घोडेस्वारी खेळ प्रकारात त्यांनी भाग घेतला आहे. त्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणा-या सर्वात वयस्कर खेळाडू ठरल्या आहेत. त्यांचं वर ६६ वर्ष आहे.

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत ज्या वेळी ती मैदानात उतरेल तेव्हा ऑलिम्पिक इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून तिची नोंद होईल.

टोकियो ऑलिम्पिक : ऑस्ट्रेलियाच्या महिला घोडेस्वार मेरी हाना

ब्रिटनच्या माजी घोडेस्वार लॉर्ना जॉन्सटन या ऑलिम्पिक इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात वयस्कर महिला अ‍ॅथलीट आहेत. जर्मनीतील म्युनिच येथे आयोजित करण्यात आलेल्या १९७२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी वयच्या ७० व्या वर्षी सहभाग नोंदवला. आजतागायत त्यांचा हा विक्रम अबाधित आहे. मेरी हाना वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून घोडेस्वारी करत आली आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून घोदेस्वारीचे धडे गिरवले. ऑलिम्पिक स्पर्धेत त्या आतापर्यंत एकही पदक जिंकू शकलेल्या नाहीत. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्या नवव्या स्थानावर राहिल्या.

१२ वर्षाची हेंड जाजा सर्वात तरुण अ‍ॅथलीट

सिरियाची हेंड जाजा अवघ्या १२ व्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहे. जाजा टेबल टेनिसमध्ये तिच्या देशाचे प्रतिनिधित्व करेल. ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेणारी ती तिच्या देशातील पहिली खेळाडूही ठरली आहे.

सिरीयाच्या १२ वर्षीय जाजाने लेबननच्या ४२ वर्षीय मारियाना सहाकिया हिचा पराभव करून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत दिमाखात एन्ट्री मिळवली. जाजा वयाच्या पाचव्या वर्षापासून टेबल टेनिस खेळत आहे. जेव्हा ती सहा वर्षांची होती तेव्हा तिने वर्ल्ड होप्स वीक एन्ड चॅलेंज इव्हेंट (दोहा) मध्ये भाग घेतला होता.

टोकियो ऑलिम्पिक : सिरियाची टेबल टेनिस खेळाडू हेंड जाजा

जाजा ऑलिम्पिक इतिहासातील पाचवी सर्वात तरुण खेळाडू असेल. सीरियाच्या सहा सदस्यीय पथक टोकियोमध्ये दाखल झाले आहे.

या पथकात जाजा ही एकमेव महिला खेळाडू आहे. सीरियाने पहिल्यांदा १९४८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. ते अद्याप कोणतेही पदक जिंकू शकलेले नाही. मागील रिओ ऑलिम्पिकमध्ये सर्वात तरुण खेळाडू म्हणून नेपाळच्या १३ वर्षाच्या जलतरणपटू गौरिका सिंहची नोंद झाली आहे.

हा पुरुष खेळाडू सर्वात वयस्कर खेळाडू…

ऑस्ट्रेलियाचे ६२ वर्षीय घोडेस्वार अ‍ॅड्रयू होय टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू ठरले आहेत. १९८४ मध्ये लॉस अ‍ॅजेलिस येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता.

यंदाची त्यांची ही आठवी ऑलिम्पिक स्पर्धा असणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया कडून सर्वाधिक वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे ते एकमेव खेळाडू ठरले आहेत. अ‍ॅड्रयू यांनी १९९२ बार्सिलोना, १९९६ अटलांटा, सिडनी २००० येथील स्पर्धेत सांघीक प्रकारात सुवर्ण जिंकले आहे.

तर व्यक्तिगत प्रकरात त्यांनी २१ वर्षांपूर्वी सिडनी ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर पदक जिंकले होते. यंदाची स्पर्धा त्यांची शेवटची असू शकते.

अधिक वाचा :

नेमबाज तेजस्विनी सावंत भारताची सर्वात वयस्कर महिला खेळाडू…

टोकियो ऑलिम्पिक : भारताची नेमबाज तेजस्विनी सावंत

४० वर्षीय नेमबाज तेजस्विनी सावंत टोकियो ओलिम्पिक स्पर्धेत भारताची सर्वात वयस्कर महिला खेळाडू ठरली आहे.

पंधरा वर्षांपूर्वी पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणार्‍या तेजस्विनी सावंतने अखेर तिचे ऑलिम्पिकचे स्वप्न पुन्हा एकदा साकार केले आहे. तेजस्विनी टोकियोमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये निशाना साधणार आहे.

'हे' आहेत आतापर्यंतचे सर्वात वयस्कर आणि तरुण ऑलिम्पिकपटू….

स्वीडनचा माजी नेमबाज ऑस्कर स्वान हे ऑलिम्पिक स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात वयस्कर खेळाडू आहेत. ऑस्कर यांनी १९२० मध्ये ७२ वर्ष २८० दिवस वय असतान ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेत त्यांनी सिल्व्हर मेडल जिंकले होते. बेल्जियम येथील अँटवर्प येथे ही स्पर्धा झाली होती.

स्वीडनचे माजी नेमबाज ऑस्कर स्वान

तर सर्वात तरुण अ‍ॅथलीट होण्याचा विक्रम ग्रीसच्या दिमित्रियोस लॉन्ड्रास यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यांनी १८९६ मध्ये अथेन्स येथे झालेल्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धेत १० वर्ष २१८ दिवस वय असताना भाग घेतला होता. जिम्नॅस्टिक क्रिडा प्रकारात त्यांचा सहभाग नोंदवला गेला. ते ओलिम्पिक इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू होण्याबरोबरच सर्वात तरुण पदक विजेते ही ठरले आहेत.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT