मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जिम मधील अवैध औषध विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलायला सुरूवात केली आहे. विशेष पथके जिमवर धाड मारणार आहेत. त्यामुळे जिममध्ये अशा औषधे आणि स्टिरॉइड्स ठेवलेल्याचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईतील उच्चभ्रू वस्तीमधील जिमच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय लवकरच विशेष मोहीम आखून जिमच्या तपासण्या करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे डी आर गहाणे, सहआयुक्त, (औषध) यांनी सांगितले.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे जिम मधील अवैध औषध विक्रीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे या विरोधात काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. मुंबईतील जिम मधील अवैध उत्तेजक द्रव्य विक्रीची तपासणी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कष्ट कमी करून तातडीने आकर्षक शरीरयष्टी बनवण्याकडे तरुणांचा कल असतो. यासाठी जिम मधील प्रशिक्षकांकडून 'सप्लिमेंट फूड'चा मारा केला जातो. तरुणांना प्रोटीन पावडर आणि स्टेरॉईड दिले जाते. याचा तरुणांच्या शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईतील काही जिम च्या तपासण्या केल्या आहेत. प्रत्यक्ष जिम मध्ये होत असलेल्या औषध विक्रीची तपासणी करण्यात येत आहे. शिवाय अनेक खासगी प्रशिक्षक औषधांचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी कारवाईची विशेष मोहीम आखली जात आहे.
आम्ही विशेष पथक यासाठी नेमणार असून ते अचानक पणे धाड मारणार आहेत. सध्या अभिनेते सिद्धार्थ शुक्लांच्या मृत्यूनंतर काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची दखल घेण्यात आली असून आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई होणार आहे.
– डॉ. डी.आर. गहाणे , सहआयुक्त , औषध प्रशासन