Latest

गणेशोत्सवासाठी 150 बस धावणार! भाजपचा उपक्रम, चाकरमानी खूश

Shambhuraj Pachindre

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजपाने गणेशोत्सवासाठी कोकणात तब्बल 150 बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, या बसने चाकरमान्यांना मोफत प्रवास करायला मिळणार आहे. यासाठी भाजप सुमारे 35 लाखांपेक्षा जास्त खर्च करणार आहे.

मुंबई महानगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने गेल्या दोन वर्षांपासूनच रणनीती आखली आहे. गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला टार्गेट करण्यासह मुंबईकरांना खूश करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यात येत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान करणारे सर्वाधिक कोकणवासीय आहेत. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी आता गणेशोत्सवासाठी विशेष बस सोडण्याचा निर्णय मुंबई भाजपने घेतला आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वी तीन ते चार दिवस या बस सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये धावणार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात किती बस सोडाव्यात याबाबत कोकणातील भाजप नेते व मुंबईतील नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सुमारे 22 हजार 500 ते 23 हजार 500 याप्रमाणे प्रत्येक बसचे भाडे असून त्यानुसार भाजपला सुमारे 35 लाख रुपये खर्च येणार आहे.

कोकण रेल्वेसह एसटी व खाजगी गाड्या यांच्या आरक्षण फुल असल्यामुळे भाजप सोडत असलेल्या विशेष गाड्यांमुळे चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी वाहतूक साधन उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसात या बसचे आरक्षण संपूर्ण मुंबईमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या बससाठी चाकरमानांना भाडे द्यावे लागणार नसल्यामुळे प्रथम येणार्‍याला प्रथम प्राधान्य याप्रमाणे तिकीट देण्यात येणार असल्याचे एका भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. अडलेल्या चाकरमान्यांना भाजपने अशी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिल्यामुळे चाकरमान्याचाच नाही तर, भाजपही थेट कोकणी माणसापर्यंत पोहोचणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT