Latest

सातारा : गजवडी येथे बिबट्याची दहशत

सोनाली जाधव

परळी : पुढारी वृत्तसेवा
सज्जनगड परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये बिबट्याने उच्छाद मांडला असून आज या गावात तर उद्या दुसर्‍या गावात बिबट्याने पाळीव प्राण्यावर हल्ला करुन धूम ठोकल्याची चर्चा रंगत आहे. गजवडी गावातील शेतकरी जयसिंग जगदाळे यांच्या दोन दिवसांपूर्वी गायब झालेल्या शेळीचा सांगाडा दोन दिवसांनी झाडावर आढळला. तर, गुरुवारी रात्री विजया जगदाळे यांच्या सतर्कतेमुळे बिबट्याने धूम ठोकल्याने शेळी वाचल्याचा प्रकार घडला.

परळी खोर्‍यात वन्यप्राण्यांचा वावर वाढला

परळी खोर्‍यात अलिकडे वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. गुरुवारी सायंकाळी आंबवडे बुद्रुकच्या शिवारात रानगवा पाहिल्याचे स्थानिक शेतकर्‍यांनी सांगितले. गजवडीत चक्क शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळी पळवल्याने शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण आहे. सज्जनगड, पांगारे, रायघर, आंबळे या डोंगररांगांत वसलेल्या गावांमधून बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. जंगली श्वापदांचा वनखात्याने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
भांबवली, आलवडी, पाटेघर, दत्तवाडी, तांबी, धावली, सांडवली, केळवली या परिसरात वन्यप्राण्यांच्या भितीने शेतकरी धास्तावले
आहेत.

बिबट्या आला तरी कोठून?

या परिसरात मोर, रानडुक्करे, गवे, अस्वल यांचा वावर आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून येथे नर- मादीसह बिबट्याची पिल्ले फिरत असल्याचे शेतकरी व गुराख्यांकडून सांगितले जात आहे. हा बिबट्या नेमका आला कोठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचलत का? 

SCROLL FOR NEXT